Bribe Crime : महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cbi officer arrested senior revenue department officer taking bribe crime pune

Bribe Crime : महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात

पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड या उच्चपदस्थ अधिकाऱ्यास भू संपादनाच्या प्रकरणात लाच घेताना ताब्यात घेतले आहे. आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. एका आयएएस उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वकील तक्रारदाराने अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. रामोड यांनी माळशिरस येथील महामार्गालगतच्या भूसंपादन प्रकरणात लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार सीबीआयने शुक्रवारी (ता. ९) सकाळी संबंधित वकिलाकडून आठ लाख रुपये घेताना डॉ. रामोड यांना ताब्यात घेतले.

या नोटांवरील बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. डॉ. रामोड यांच्या नांदेड येथील घरीही सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे. सीबीआय अधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्त कार्यालयात रामोड यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. डॉ. रामोड यांचा २०२० मध्ये आयएएस केडरमध्ये समावेश झाला होता.

बाणेर येथील सदनिकेत मोठे घबाड?

बाणेर येथील ऋतुपर्ण सोसायटीत सी विंगमध्ये चौथ्या मजल्यावर डॉ. रामोड यांची सदनिका आहे. सीबीआयचे अधिकारी हे आज दुपारी दीडच्या सुमारास या सोसायटीत पोचले. त्यानंतर पुन्हा दहा मिनिटांनी दोन गाड्यांमधून अधिकारी-कर्मचारी दाखल झाले. त्यांनी या सदनिकेतचा ताबा घेतला. या सदनिकेत अधिकाऱ्यांना मोठे घबाड सापडल्याची चर्चा आहे. त्यासाठी नोटा मोजण्याच्या दोन मशिन मागविण्यात आल्या असून, पैशांची मोजदाद सुरू आहे.

टॅग्स :CBIbribeRevenue