"सीबीएसई'चे विद्यार्थीही करणार दहावीत "स्कोअर' 

सलील उरुणकर 
गुरुवार, 4 मे 2017

पुणे - "सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ने (सीबीएसई) यंदापासून सातत्यपूर्ण मूल्यमापनाऐवजी बोर्डाची परीक्षा पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा "घोका आणि ओका' या केवळ स्मरणशक्तीवर आधारित पारंपरिक पद्धतीचा अंगीकार केल्याने स्पर्धात्मकता हद्दपार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. "सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनाही "स्कोअरिंग'ची संधी मिळणार असली, तरी केवळ गुणांचाच अतिरेकी विचार होणार आहे. परिणामी त्याचे दुष्परिणाम जाणवणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

पुणे - "सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ने (सीबीएसई) यंदापासून सातत्यपूर्ण मूल्यमापनाऐवजी बोर्डाची परीक्षा पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा "घोका आणि ओका' या केवळ स्मरणशक्तीवर आधारित पारंपरिक पद्धतीचा अंगीकार केल्याने स्पर्धात्मकता हद्दपार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. "सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनाही "स्कोअरिंग'ची संधी मिळणार असली, तरी केवळ गुणांचाच अतिरेकी विचार होणार आहे. परिणामी त्याचे दुष्परिणाम जाणवणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

"सीबीएसई'ने दहावीच्या बोर्डाची परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी जाहीर केला. त्यामुळे यापूर्वी लागू असलेले द्विपरीक्षेचे मॉडेल (स्कीम 1 आणि 2) म्हणजे "कन्टिन्यूअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन सिस्टिम' आता बंद झाली आहे. नव्या पद्धतीत बोर्डाच्या परीक्षेसाठी 80 टक्के आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 टक्के अशी गुण विभागणी आणि महत्त्व दिले आहे. 

विज्ञान, गणित, समाजशास्त्र, भाषा 1 व 2 या विषयांसाठीचे 80 गुण (बोर्ड परीक्षा) हे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेत दिले जातील. सहाव्या विषयासाठी मात्र बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांचे महत्त्व हे विषयानुरूप बदलते ठेवले आहे. होम सायन्ससाठी 75 गुण, पेंटिंगसाठी 100, एनसीसीसाठी 70, संगीतासाठी 25, एफआयटी, आयसीटीसाठी 40, एलिमेंट्‌स ऑफ बिझनेस, एलिमेंट्‌स ऑफ बुक-कीपिंग अँड अकाउंटन्सीसाठी 100 तर ई-पब्लिशिंगसाठी 30 गुण निर्धारित केले आहेत. 

दहावीसाठीही 9-पॉइंट ग्रेडिंग 
बारावीसाठी असलेली "9-पॉइंट ग्रेडिंग' पद्धत दहावीसाठीही लागू केली जाणार आहे. अंतर्गत मूल्यमापनात ठराविक कालावधीत घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांसाठी 10 गुण, दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणे, वहीच्या "स्वच्छते'साठी 5 गुण आणि वक्‍तृत्व कौशल्य आणि "प्रोजेक्‍ट वर्क'सह विषयानुरूप उपक्रमांसाठी 5 गुण निर्धारित केले आहेत. दहावीसाठी ही पद्धत जाहीर केल्यानंतर "सीबीएसई'ने सहावी ते नववीसाठीही अशाच पद्धतीने परीक्षा घेण्याची मुभा त्यांच्याशी संलग्न असलेल्या शाळांना दिली आहे. परीक्षा पद्धतीमध्ये सुसूत्रीकरण आल्यास विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ताण येणार नाही, असे मत "सीबीएसई'चे अध्यक्ष आर. के. चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. 

"सीबीएसई'ने केलेला हा बदल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला आहे. दीर्घकालीन विचार केल्यास या पद्धतीचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होईल. "सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनाही स्कोअरिंगच्या दृष्टीने ही पद्धत योग्य ठरेल. 
- चारुशीला नरुला, संस्थापक, युनिव्हर्सिटी कनेक्‍शन व सदस्या इंटरनॅशनल असोसिएशन फॉर कॉलेज ऍडमिशन कौन्सिलिंग 
 

"सीबीएसई' 
- एक कोटी मुलांवर प्रभावी टाकणारी संस्था 
- देशात 18 हजारांपेक्षा अधिक शाळा संलग्न 
- "कन्टिन्यूअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन सिस्टिम'ची 2009-10 मध्ये सुरवात 
- बोर्ड परीक्षा पद्धत 2017-18 पासून पुन्हा लागू 
- अभ्यास आणि वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा ताण विद्यार्थ्यांवर वाढण्याचा धोका

Web Title: CBSE students will also do the 10th score