नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
पिंपरी - नोटाबंदीच्या विरोधात नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. ९) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या सरकार विरोधी घोषणांमुळे पिंपरी चौक दणाणून गेला.

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
पिंपरी - नोटाबंदीच्या विरोधात नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. ९) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या सरकार विरोधी घोषणांमुळे पिंपरी चौक दणाणून गेला.

या वेळी झालेल्या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस व पिंपरी चिंचवड शहराच्या निरीक्षक रूपाली कापसे, रेणुका पाटील, शहराध्यक्ष सचिन साठे, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, संग्राम तावडे, श्‍यामला सोनावणे, निगार बारस्कर, कविचंद भाट, नरेंद्र बनसोडे, राजेंद्र वालिया यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आंदोलनाची वेळ आणि विषयही एकच होता. एकीकडे राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने आंदोलन सुरू करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. थाळीनाद करीत, ‘भाजप सरकार-हाय हाय, हुकूमशाही सरकारचा निषेध असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी आप आगे बढो-हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

या वेळी बोलताना शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, ‘‘भाजप सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचा मी जाहीर निषेध करतो. आत्तापर्यंत बॅंकेच्या रांगेत १२५ जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे या सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मोदी यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. ते हुकूमशाही पद्धतीने वागतात. राहुल गांधी यांनी जे पाच प्रश्‍न विचारले आहेत त्या प्रश्‍नांची उत्तरे मोदी हे लोकसभेत किंवा जनतेलाही देत नाहीत. ती उत्तरे जनतेला द्यावीच लागतील.’’

ते म्हणाले, ‘‘मोदी सरकारप्रमाणे फडणवीसांचे सरकारही जनतेला फसवत आहे. त्यांनी अनधिकृत बांधकाम अधिकृत करणार, शास्तीकर रद्द करणार, अशी घोषणा केली होती. स्मार्ट सिटी योजनेबाबतही शहरावर अन्याय केला आहे. स्थानिक नेत्यांना व नागरिकांना प्रलोभने दाखविली जात आहेत. जर भाजपने आपला कारभार सुधारला नाही तर भाजपच्या नेत्यांना शहरात फिरू देणार नाही,’’ असा इशाराही दिला.

...तर कैद्यांनाही भाजपमध्ये घ्यावे
अनेक ठिकाणी गुंडांना भाजपमध्ये खुलेआम प्रवेश दिला जात आहे. भाजपमध्ये गेला आणि पवित्र झाला, असेच त्यांना वाटत आहे. यामुळे भाजप सरकारने तुरुंगातील सर्व कैद्यांना सोडून भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांनाही पवित्र करावे, असा खोचक टोलाही साठे यांनी भाजपला लगावला.

शहरात राष्ट्रवादीचा मोर्चा

नोटाबंदीच्या दोन महिन्यांनंतरही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात चिंचवडस्टेशन ते पिंपरीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (ता. ९) मोर्चा काढला. मोर्चामुळे चिंचवड ते पिंपरीदरम्यान वाहतुकीची कोंडी झाली.

मोर्चात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, योगेश बहल, मंगला कदम, नाना काटे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे आदी सहभागी झाले होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. 

भोईर म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा निर्णय भाजप सरकारने घेतला त्याला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. मात्र, किती काळा पैसा बाहेर आला याचे उत्तर सरकारने जनतेला द्यावे.’’ 

पक्षनेत्या कदम म्हणाल्या, ‘‘मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना त्रास होत आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांकडे तसेच ठराविक व्यापाऱ्यांकडे नवीन नोटांचे घबाड कसे मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांच्या लग्नासाठी अडीच लाख रुपये आणि भाजप नेत्यांच्या मुलांच्या लग्नात खर्च करण्यासाठी कोट्यवधी येतात कोठून, हे कळण्या इतकी जनता दुधखुळी नाही.’’

बहल म्हणाले, ‘‘तुमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, परदेशातील काळा पैसा देशात आणणार, कुख्यात गुंड दाऊदला फरफटत आणणार, असे सांगून थापा मारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापैकी कोणते काम केले हे जनतेला सांगावे.’’

शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, ‘‘नोटाबंदीमुळे एटीएम आणि बॅंकांसमोर रांगा लागल्या आहेत. रांगेत आत्तापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून, मोदी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. स्वतःचे पैस नागरिकांना काढता येत नाहीत. कोणताही काळा पैसा बाहेर आला नाही. बनावट नोटाही पकडल्या नाहीत. यामुळे मोदी सरकारचा निर्णय पूर्णपणे फसलेला आहे.’’

महिला आघाडी आक्रमक
सकाळी सव्वादहाच्या सुमारास निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व महिला आघाडी करत होती. त्यांनी ‘या सरकारचे करायचे काय-खाली डोके वर पाय, मोदी सरकार हाय-हाय’ अशा घोषणा दिल्या.

चमकोगिरी व सेल्फी
मोर्चा सुरू झाल्यानंतर मोर्चातील गर्दीसोबत तसेच स्थानिक नेत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची गडबड सुरू होती, तर दुसरीकडे मोर्चा पिंपरीत पोचल्यानंतर आपला फोटो छापून येईल, अशा ठिकाणी उभे राहण्यासाठी कार्यकर्त्यांची धक्‍का-बुक्‍की सुरू होती. नेत्यांनी दिलेल्या सूचनेकडेही ते दुर्लक्ष करीत होते.

Web Title: ccongress agitation for currency ban