पुणे स्टेशनचा परिसर भीमगीतांनी दुमदुमला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

'बोलो रे बोलो, जय भीम बोलो', "एकच साहेब बाबासाहेब' असा जयघोष करत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रविवारी अभिवादन करण्यात आले.

पुणे : 'बोलो रे बोलो, जय भीम बोलो', "एकच साहेब बाबासाहेब' असा जयघोष करत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रविवारी अभिवादन करण्यात आले. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर विविध भीमगीतांनी दुमदुमून गेला होता. महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठा जनसागर लोटला होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन येथे त्यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती. शनिवारी रात्रीपासून नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. रविवारी सकाळी विविध संघटना, संस्था व राजकीय पक्षांच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, बसपचे उमेदवार उत्तमराव शिंदे सरकार आदींनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच, शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. डॉ. आंबेडकरांच्या "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' या शिकवणीचे समाजाने अनुकरण करण्याचे आवाहन या वेळी विविध संघटना व संस्थांच्यावतीने करण्यात आले. 

डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पुतळ्याच्या परिसरात भर उन्हामध्ये नागरिकांच्या रांगा व गर्दीचे चित्र होते. अनेक जण सहकुटुंब येऊन अभिवादन करत होते. भारतीय संविधान, डॉ. आंबेडकरांनी व इतरांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके आणि भगवान गौतम बुद्ध यांचे फोटो खरेदी करण्यासाठी परिसरातील स्टॉलवर गर्दी झाली होती. तरुणांचे गट हलगीच्या ठेक्‍यावर बाबासाहेबांनी दिलेली शिकवण गीतांच्या माध्यमातून सादर करून जनजागृती करत होते, त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत होता. 

भोजन, पाण्याची व्यवस्था 
डीजे, बॅंडच्या तालावर होणाऱ्या डॉ. बाबासाहेबांच्या जल्लोषामुळे परिसर दुमदुमून गेला होता. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी भोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विविध संघटनांनी केली होती. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: Celebrating birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar