समुद्रकिनारी सेलिब्रेशनचा बेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी...अन्‌ नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटकांनी निळ्याशार समुद्रकिनाऱ्याचा पर्याय निवडला आहे. कोकणपाठोपाठ महाबळेश्‍वर, मुळशी येथील हॉटेल्सचे बुकिंगही "फुल्ल' झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी थर्टीफर्स्टच्या पर्यटनाचे नियोजन करणाऱ्यांना मात्र "वेटिंग' करावे लागत आहे.

पुणे - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी...अन्‌ नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटकांनी निळ्याशार समुद्रकिनाऱ्याचा पर्याय निवडला आहे. कोकणपाठोपाठ महाबळेश्‍वर, मुळशी येथील हॉटेल्सचे बुकिंगही "फुल्ल' झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी थर्टीफर्स्टच्या पर्यटनाचे नियोजन करणाऱ्यांना मात्र "वेटिंग' करावे लागत आहे.

राज्यातील बहुतांश हॉटेल्स आणि रिसॉर्टचे बुकिंग यापूर्वीच फुल्ल झाले आहेत. काही रिसॉर्ट हे ख्रिसमसच्या आधीपासूनच पर्यटकांच्या गर्दीने तुडुंब भरली आहेत. "थर्टीफर्स्ट'चे सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्रकिनारे, गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे यांना पसंती दिली जात आहेच; परंतु त्याचबरोबर धार्मिक स्थळांनाही भेटी देण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो.

हॉटेल्सतर्फे खास आकर्षक पॅकेज देण्यात आले आहे. त्या दिवशी हॉटेल्सच्या खोल्यांचे दर कमी करण्यात आले असले, तरीही सेलिब्रेशन पार्टीसाठी वेगळे चार्जेस आकारले जात आहे. जोडप्यासाठी प्रत्येक ठिकाणी आकर्षक ऑफर्स पाहायला मिळतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची राज्यातील सर्व रिसॉर्ट फुल्ल आहेत.

याबद्दल प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण म्हणाल्या, ""नागरिकांनी दोन-तीन महिन्यांपूर्वीच बुकिंग करून ठेवले आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या ठिकाणांना अनेकांनी पसंती दिली आहे. खासकरून हरिहरेश्‍वर, काशिद, अलिबाग असे पर्याय पर्यटकांनी निवडले आहेत. कोकणाबरोबरच महाबळेश्‍वर, पाचगणी, कार्ला, ताडोबा परिसरातील बुकिंगही फुल्ल झाले आहे. एरवी महाबळेश्‍वरला 60 ते 70 हजार पर्यटक असतात; परंतु येथे 31 डिसेंबरला अंदाजे 90 हजार पर्यटक येण्याची शक्‍यता आहे. या दिवशी लोणावळा आणि खंडाळा परिसरातही 80 ते 90 हजारांच्या आसपास पर्यटक असतील.''

"ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ पुणे'चे संचालक नीलेश भन्साळी म्हणाले, ""रात्री उशिरापर्यंत आणि संपूर्ण रात्रभर सेलिब्रेशन असणाऱ्या हॉटेल्स किंवा इव्हेंटला तरुणाई खासकरून प्राधान्य देत आहे. हॉटेल्सने एक जानेवारीचा "ब्रंच' (ब्रेकफास्ट कम लंच) च्या ऑफर्स देऊ केल्या आहेत. धार्मिक स्थळांना भेट देण्याचाही पर्याय हटके ठरत आहे. धागडधिंग्यापासून लांब जाऊ पाहणारे पर्यटक तुम्हाला खासकरून धार्मिक स्थळांवर दिसतील.''

* पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे :-
- समुद्रकिनारे : गोवा, अलिबाग, मांडवा, काशिद, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर
- थंड हवेची ठिकाणे : महाबळेश्‍वर, पाचगणी, लोणावळा-खंडाळा
- मुळशी, वेल्हे, ताम्हिणी, सिंहगड पायथा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebration Contemplation sea