सिमेंट व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्याला अटक

जनार्दन दांडगे
गुरुवार, 29 मार्च 2018

लोणी काळभोर (पुणे) : सासवड (ता. पुरंदर) येथील सिमेंट व्यापाऱ्याची फसवणूक करून फरारी झालेल्या आरोपी योगेश कांतीलाल शहा (वय - ४०, रा. विकासनगर, गजानन दर्शन, सातारा) यास जेरबंद करण्यात बुधवारी (ता. २८) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. याबाबत सुधीर माणिकचंद मुथा यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर मुथा यांचे सासवड बाजारपेठ येथे मुथा अँड सन्स एसीसी सिमेंट डिलरशिपचे दुकान आहे. आरोपी योगेश शहा (मुळ रा. नऱ्हे रोड, धायरी, ता.हवेली, सध्या रा.विकासनगर, जि. सातारा) याने सुधीर मुथा यांचा विश्वास संपादन केला. यातून जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ या काळात दुकानातून एकूण १७ लाख ९७ हजार ८१६ रुपयांची परस्पर सिमेंटविक्री करून सुधीर मुथा यांचा विश्वासघात केला.  

गुन्हा केल्यापासून योगेश शहा फरारी होता, तसेच नुकताच तो सातारा येथे राहत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस नाईक महेश गायकवाड, निलेश कदम,सचिन गायकवाड यांच्या पथकाने सातारा येथे जाऊन माहिती घेतली. दरम्यान पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाल्याप्रमाणे आरोपी योगेश शहा सातारा येथील आदर्श नगर चौक येथे येताच त्याला जेरबंद केले.

आरोपी योगेश शहा यांच्या विरोधात चाकण, मंचर, खेड, सिंहगड रोड तसेच जिल्ह्यातील सासवड व नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील तापसासासाठी आरोपीला सासवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आणखी कोणत्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाली असल्यास सासवड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गावडे यांनी केले आहे.

Web Title: Cement trader cheating accused arrested