मंचर (पुणे) : मंचर परिसरात निघोटवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या हद्दीत इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या राजगौड (आदिवासी) समाजाला दफनभूमीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वीस गुंठे जागा दिली आहे. "अखेरचा प्रवासही तब्बल साठ किलोमीटरचा' अशी बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल प्रशासनाने घेतली आहे.
राजगौड समाजाची 70 ते 80 वर्षांपासून 50 ते साठ कुटुंबे इंदिरानगरमध्ये राहतात. लोकसंख्या 300च्या आसपास आहे. सर्व कुटुंब दारिद्रयरेषेखाली असून घरकुलामध्ये राहतात. कानातील मळ काढणे, हमाली, भंगार गोळा करणे व रस्त्यावर बसून आयुर्वेदिक वनस्पती विकण्याचा व्यवसाय हे लोक करतात. आपली जिवलग व्यक्ती गेल्यावर त्या दुखात असलेल्यांना मानसिक तणाव असतो. त्यातच दफन विधीची चिंता त्यांना लागून होती. अपघातग्रस्त व्यक्ती असल्यास पोलिस ठाणे, शवविच्छेदन, रुग्णवाहिका मिळविणे, अशा विविध अडचणीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते.
या समाजातील लोकांना दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना वणवण करावी लागत होती. खडकी-पुणे येथील दफनभूमीत परवानगी घेऊन पैसे मोजल्यानंतरच दफन केले जात होते. याबाबत मंचर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य वसंतराव विष्णू बाणखेले हे दफनभूमीसाठी जागा मिळावी म्हणून गेली बारा वर्षे पाठपुरावा करत होते. पण प्रशासनाकडून त्यांना दाद मिळत नव्हती. पण हा विषय "सकाळ'ने लावून धरला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. जागा मिळवून देण्याचे सर्व श्रेय "सकाळ'ला आहे. आंबेगाव-जुन्नर विभागाचे तत्कालीन प्रांत अधिकारी अ जित देशमुख, राजगौड समाजाचे राजू जाधव व निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट यांचेही सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.
राजगौड समाजावर जात पंचायतीचा पगडा आहे. जर अग्नीडाग दिला तर संबंधित कुटुंबावर बहिष्कार टाकला जातो. त्या भीतीपोटी अग्नीडाग दिला जात नाही. मृतदेहांचे हाल थांबविण्यासाठी मंचर-निघोटवाडी ग्रामपंचायत व प्रशासनाने दखल घेऊन मृत्यूनंतरही होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी दहा वर्षे करत होतो.
वसंतराव विष्णू बाणखेले, माजी सदस्य, मंचर ग्रामपंचायत
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.