जाऊया मधमाश्यांच्या अद्भुत साम्राज्यात (व्हिडिओ)

जाऊया मधमाश्यांच्या अद्भुत साम्राज्यात (व्हिडिओ)

पुणे - मधमाश्या नृत्य करतात हे माहीत आहे का? त्यांच्यामुळे मध जसा मिळतो, त्याप्रमाणे परागीभवन होऊन झाडांना जास्त फळं लागतात, हे माहीत होतं का? मधमाश्यांचं विलक्षण जीवन समजून घेण्यासाठी जाऊया पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील 'केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्रा'त. "मधमाश्या नृत्य करत आहेत, असं आपल्याला वाटतं तेव्हा त्या एकमेकींशी संवाद साधत असतात. 

छान फुलं कुठं आहेत, कुठून जास्त मकरंद गोळा करून आणता येईल, हे सांगण्यासाठी त्या प्रतिकात्मक हालचाली करतात. ते आपल्याला नृत्य वाटतं.  फुलं कुठल्या दिशेला आणि किती अंतरावर आहेत, हे नाचणाऱ्या मधमाश्या दुसऱ्या मधमाश्यांना सांगून तिकडे पाठवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाश्यांची नृत्याची पद्धत वेगळी असते," ही मजेदार माहिती या केंद्राच्या उपसंचालक डॉ. के. लक्ष्मी राव सांगत होत्या. 

या केंद्रात निरनिराळ्या प्रकारच्या मधमाश्या पाळलेल्या आहेत. डॉ. लक्ष्मी म्हणाल्या," मधमाश्या फुलांमधून मकरंद गोळा करून आणतात. त्यांच्या लाळेची त्यावर प्रक्रिया होऊन मध तयार होतो. त्यात विविध पौष्टिक घटक असतात. मधाचा गोड खाऊ आपल्याला देण्याबरोबरच मधमाश्यांमुळे वनस्पतींमधील परागीभवन क्रिया घडून येते. एखाद्या फळबागेत मधमाश्या असतील तर त्यांच्यामुळे घडून येणाऱ्या परागीभवनामुळे तिथल्या झाडांना जास्त फळं लागतात, असं अभ्यासाने सिद्ध झालं आहे. "

 डॉ. लक्ष्मी यांनी मधमाश्यांच्या जीवनशैलीवर पीएचडी केली आहे. राष्ट्रीय वनस्पती बहर दिनदर्शिका त्यांनी तयार केली आहे. म्हणजे भारतातल्या कोणत्या प्रांतात, कोणत्या काळात, कोणत्या वनस्पतींना बहर येतो, याचं वेळापत्रक. या आधारे तिथल्या शेतकरी व मळेवाल्यांनी त्यांच्या शेत किंवा फळबागेत पेट्यांमधून मधमाश्या पाळल्या तर त्यांच्याकडचं पीक उत्तम येऊ शकतं. पर्यावरण संतुलन राखणाऱ्या मित्र कीटक  म्हणून मधमाश्यांचं महत्त्व फार मोलाचं आहे. या केंद्रात मधमाश्यांबद्दल सखोल माहिती देण्यासाठी संग्रहालयसुद्धा आहे. ते पहायलाच हवं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com