मूळ कागदपत्रे दाखविण्याची सक्ती मागे 

मूळ कागदपत्रे दाखविण्याची सक्ती मागे 

पुणे - नॅशनल परमिट असलेल्या ट्रकला दोन चालकांची सक्ती केंद्र सरकारने रद्द केली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या नव्या आणि आठ वर्षांच्या आतील वाहनांना दर दोन वर्षांनी परमिटचे नूतनीकरण करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यात व्यावसायिक वाहनांच्या (ट्रान्स्पोर्ट) वापरातील काही तरतुदींमध्ये बदल झाला असून, येत्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. 

नॅशनल परमिट असलेल्या वाहनांमध्ये प्रवासादरम्यान दोन चालक असावेत, अशी सक्ती होती. चालक मिळत नसल्यामुळे ही सक्ती रद्द करावी, अशी मागणी माल वाहतूकदार गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. त्यानुसार आता ही सक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच नॅशनल परमिटच्या गाड्यांना विशिष्ट रंग द्यावा, हे बंधनही शिथिल करण्यात आले आहे. वाहनाच्या कागदपत्रांची मूळ प्रत बाळगण्याचे या पूर्वी सक्तीचे होते. त्यामुळे अनेकदा पोलिस कागदपत्रे ताब्यात घेऊन अडवणूक करीत, अशी माल वाहतूकदारांची तक्रार होती. याबाबत आता वाहनांची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात दाखविली तरी चालतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आठ वर्षांच्या आतील वाहनांचे परमिट नूतनीकरण दरवर्षी करण्याऐवजी दर दोन वर्षांनी केले तरी चालेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, सर्व वाहनांना "जीपीएस' बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या बदलाचे स्वागत केले आहे. मात्र, "आरटीओ' कार्यालयांत पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असेही आवाहन त्यांनी राज्याच्या परिवहन आयुक्तांना केले आहे. 

केंद्र सरकारने केलेल्या बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी काही बाबींचे स्पष्टीकरण राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयात विचारण्यात आले आहे. त्याबाबत माहिती मिळाल्यावर या बदलाची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. बस, ट्रक, टेंपो, टॅंकर आदी वाहनांचा यामध्ये समावेश आहे. रिक्षा, टॅक्‍सी, जीपबाबत परिवहन आयुक्त कार्यालय स्पष्टीकरण करणार आहे. 
- बाळासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे 

अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांची पूर्तता केंद्र सरकारने केली आहे. त्याबद्दल माल वाहतूकदारांतर्फे आम्ही स्वागत करतो. परंतु, नॅशनल परमिट असलेल्या वाहनांचे परमिट पासिंग देशातील कोणत्याही शहरातील आरटीओ कार्यालयात करण्यास परवानगी द्यावी, ही मागणी अद्याप मान्य झालेली नाही. त्याचाही संघटना पाठपुरावा करीत आहे. 
- प्रसन्न पटवर्धन, अध्यक्ष, राज्य ट्रक, टेंपो, टॅंकर, बस वाहतूक महासंघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com