शंतनूच्या आयुष्याला मिळतोय आकार!

शंतनूच्या आयुष्याला मिळतोय आकार!

पुणे - प्रसूतीसाठी फलटणजवळच्या रुग्णालयात दाखल करून दोन दिवस झाले होते, पण डॉक्‍टर प्रसूती करत नव्हते. अखेर डॉक्‍टरांनी ‘सिझेरीयन’चा निर्णय घेतला. त्यातून गुंतागुंत झाली आणि जन्मतः बाळ रडलेच नाही. अशात त्यांनी नवजात अर्भकाच्या पायाला एकदा नाही, तर दोनदा सुई टोचली आणि ते रडले. यात त्याच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने काही पेशी मृत झाल्या. त्यातून त्या बाळाची चालण्याची आणि बोलण्याची शक्ती गेली ती कायमचीच! नऊ महिन्यांनंतर शहरातील डॉक्‍टरांनी त्याला सेरेब्रल पाल्सी झाल्याचे निदान केले... 

फलटण तालुक्‍यातून आलेले आदलिंगे दांपत्य बोलत होते. बोलताना वारंवार प्रयत्न करूनही त्यांचे अश्रू थांबत नव्हते. शंतनू त्या मुलाचं नाव. नियमित फिजिओथेरपी हाच त्यावरील प्रभावी उपाय... गावात राहून ते शक्‍य होईना... त्यासाठी सारखे पुण्यात येणं परवडेना... मग बाळाच्या उपचारासाठी गावातून पुण्यात स्थलांतरित झालो... मार्केट यार्डमध्ये फळ विक्री करतो... पण, फिजिओथेरपीचा एकही दिवस चुकू देत नाहीत, असे ते सांगत होते.

उद्या (ता. ६) असलेल्या जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. हे दांपत्य सलग पाच वर्षे उपचारासाठी राज्यभर फिरत होते. आर्थिक परिस्थितीही बेताचीच असली, तरी बाळ चांगले होण्यासाठी कोणी सांगेल त्या डॉक्‍टरांकडे धावत होते. त्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील बालरोग विभागात हे दांपत्य बाळाला घेऊन आले.

येथील डॉक्‍टरांना त्यांना फिजिओथेरपी हाच यावरचा मार्ग असल्याचे सांगितले. जन्मल्यानंतर पाच वर्षांनी शंतनूवर योग्य उपचार सुरू झाले. त्याला तो प्रतिसाद देत आहे. मोबाईलमधील वेगवेगळी ‘फंक्‍शन’ सहजतेने करत आहे. वेगवेगळ्या ‘ॲक्‍टिव्हिटी’तून त्याची बलस्थान शोधण्यात येत आहे. त्यातूनच पुढे त्याचे आयुष्य साकारेल, असा विश्‍वास या दांपत्याला आला आहे.

नियमित फिजिओथेरपीतून सेरेब्रल पाल्सीच्या लहान मुलांमध्ये निश्‍चित सुधारणा होते. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे या आजाराच्या रुग्णांचे पुनर्वसन करण्यास मदत होत आहे. 
- माधवी केळापुरे, लहान मुलांचे फिजिओथेरपिस्ट

नवजात अर्भकाच्या मेंदूला ऑक्‍सिजन पुरेशा प्रमाणात मिळाला नाही, तर सेरेब्रल पाल्सी आजार होतो. तो टाळण्यासाठी गर्भवतींची नियमित तपासणी केली पाहिजे.  
- डॉ. उमेश कलाने, बाल मेंदुविकारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com