पुण्यात सोनसाखळीचोरांचा उच्छाद

पुण्यात सोनसाखळीचोरांचा उच्छाद

पुणे - शहरात खून, घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच सोनसाखळी चोरांनी शहरात उच्छाद मांडला आहे. सिंहगड, वारजे परिसरासह अन्य काही भागात सोमवारी (ता.४) सायंकाळी सोनसाखळी चोरट्यांनी पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले. अवघ्या अर्ध्या तासात चार आणि दोन तासांच्या अंतरानंतर पुन्हा एक अशा पाच सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.  

सोनसाखळी चोरीची पहिली घटना मानाजीनगर मंडई परिसरात काल सायंकाळी सहा वाजता घडली. मंडईमधून भाजी खरेदी करून घरी परतणाऱ्या ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ३७ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेले. यानंतर हिंगणे खुर्द येथील ६१ वर्षीय महिला सहा वाजून १० मिनिटांनी खासगी शिकवणीला गेलेल्या नातीला घेऊन घरी येत होत्या. आनंदनगर येथे चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३८ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. त्यानंतर पाच मिनिटांनीच वडगाव बुद्रुक येथील जिजामाता बहुउद्देशीय केंद्राजवळून मैत्रीणीसोबत पायी फिरायला जात असलेल्या ४७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. या तीन घटना १५ मिनिटांच्या अंतरात सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.  या घटनांनंतर आणखी पंधरा मिनिटांनी डावी भुसारी कॉलनी येथे साखळीचोरीची घटना घडली. ५७ वर्षीय महिला सहकाऱ्यांसमवेत देवदर्शन करून येत होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी वेदभवनजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या गळ्यातील ६८ हजार ७५० रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. त्याविरुद्ध महिलेने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन तासांनी वानवडीत साखळीचोरीची घटना घडली. येथील विकासनगर सोसायटीच्या मंदिरातून देवदर्शन करून परतणाऱ्या ७४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. 

पोलिस गस्तीचे प्रमाण कमी 
पहाटे व सायंकाळी सोनसाखळी, मोबाईल, पर्स चोरी, रिक्षातून  बॅग पळविण्याच्या घटना शहराच्या  उपनगरांबरोबरच मध्यवर्ती भागामध्येही मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे ठरावीक वेळेत गस्त घालणारे किंवा विशेष पथकातील पोलिस रस्त्यावर असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात तसे घडत नसल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळते. तक्रार दिल्यानंतरही सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याला दुय्यम स्थान देऊन त्याच्या तपासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com