साखळीचोरांचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

अशी घ्या काळजी 
  रस्त्याने जाताना दागिने दिसू नयेत
  कार्यक्रमस्थळी दागिने घालावेत
  इतर वेळी शक्‍यतो बेंटेक्‍सचे     दागिने घालावेत
  चालताना सतर्क असावे 

पुणे - शहरात सकाळी सकाळी दुचाकीवरील साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सात ते साडेआठ या अवघ्या दीड तासांमध्ये वानवडी, विश्रामबाग, समर्थ, फरासखाना आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी जेष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तीन लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे पुन्हा पोलिसांच्या नाकाबंदीची पोलखोल झाली आहे.

वानवडी येथील जगताप चौकात सातच्या सुमारास पहिली घटना घडली. पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने हिसकाल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्यानंतर समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठेत तीन तोळ्याचे दागिने हिसकावून चोरून नेले. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फडके हॉल आणि लोखंडे तालीम येथे दोन महिलांच्या गळ्यातील प्रत्येकी २.५ तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरसीएम महाविद्यालय येथे पावणे नऊच्या सुमारास दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले आहे. बिबवेवाडी येथे देनाललक्ष्मी सोसायटी येथे ८.३५ वाजता दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. 

सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून चोरट्यांनी लागोपाठ सहा साखळी चोऱ्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ उडाली. पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘‘परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’’ अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

वटसावित्री पौर्णिमेची आठवण
गेल्यावर्षी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसकावण्याच्या १४ घटना घडल्या होत्या. 

हेल्मेट अन तोंडाला मास्क 
साखळी चोरट्यांनी त्यांचे चेहरे सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नयेत, याची खबरदारी बाळगली होती. दुचाकी चालविणाऱ्याने काळ्या रंगाचे हेल्मेट तर पाठीमागे बसलेल्याने डोक्‍यावर पांढरी टोपी आणि तोंडाला मास्क बांधले होते. त्यामुळे त्याचाही चेहरा दिसत नव्हता. या दुचाकीची समोरची नंबरप्लेट काढून टाकली आहे, पाठीमागच्या नंबरप्लेटवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अशी घ्या काळजी 
  रस्त्याने जाताना दागिने दिसू नयेत
  कार्यक्रमस्थळी दागिने घालावेत
  इतर वेळी शक्‍यतो बेंटेक्‍सचे     दागिने घालावेत
  चालताना सतर्क असावे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chain snatchers terror in pune city