चाकण एमआयडीसीला वीजपुरवठा बंदचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे - महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही व १३२ केव्ही अशा दोन वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकण शहर, परिसर तसेच चाकण एमआयडीसीमध्ये काल मध्यरात्री एक ते अडीच तास वीजपुरवठा विस्कळित झाला होता. परिणामी दुरुस्तीसाठी चाकण एमआयडीसीमधील सुमारे साडेतीन हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद ठेवावा लागला.

बुधवारी रात्री सव्वा अकराला महापारेषणच्या चाकण उपकेंद्रातून जाणाऱ्या ४०० केव्ही वीजवाहिनीमध्ये दोन ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे चाकण शहर, परिसर, कुरळी गाव, तसेच चाकण एमआयडीसीमध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात आला. मात्र, भार व्यवस्थापन शक्‍य न झाल्यामुळे चाकण एमआयडीसीला वीजपुरवठा करणाऱ्या सारा सिटी, कुरुळी आणि खलुंब्रे या २२ केव्ही वीजवाहिन्यांवर नाइलाजाने प्रत्येकी दोन तासांचे भारनियमन करावे लागले. दरम्यान, दुरुस्तीसाठी याच ४०० केव्ही वीजवाहिनीच्या मनोऱ्याखाली असलेल्या महावितरणच्या वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीमधील कल्याणी, एमआयडीसी, सारा सिटी व नगर फोर्जिंग या २२ केव्हीच्या चार वीजवाहिन्यांवरील सुमारे साडेतीन हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा आज दिवसभर बंद ठेवावा लागला. याशिवाय बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास महापारेषण कंपनीच्या चाकण- चिंचवड या १३२ केव्ही वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या ३३ केव्ही क्षमतेच्या एकूण ७ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी राजगुरुनगर शहर, पाईट व वाडा या गावांसह भोसरी, तळवडे एमआयडीसी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या ४ वीजवाहिन्यांना १३२ केव्ही नारायणगाव वीजवाहिनीद्वारे पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

Web Title: Chakan MIDC remain closed due to power supply