चाळकवाडी टोलवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

आळेफाटा/पिंपळवंडी - जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन करून चाळकवाडी टोलनाका बंद पाडला होता. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आधी घोषित केल्यानुसार आंदोलन करून टोलनाका बंद करण्याची मागणी केली. या वेळी भर पावसातही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

आळेफाटा/पिंपळवंडी - जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन करून चाळकवाडी टोलनाका बंद पाडला होता. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आधी घोषित केल्यानुसार आंदोलन करून टोलनाका बंद करण्याची मागणी केली. या वेळी भर पावसातही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उद्योजक किशोर दांगट, जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज वाजगे, कार्याध्यक्ष अतुल भांबेरे उपस्थित होते. 

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा ते खेड दरम्यानची रस्त्याची व पुलांची प्रलंबित कामे पूर्ण झाल्याशिवाय व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे अतुल बेनके यांनी सांगितले. 

बेनके म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी युवक संघटनेच्या माध्यमातून नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली सनदशीर मार्गाने चाळकवाडी टोलनाका बंदचे आंदोलन करण्यात आले आहे. आळे ग्रामपंचायतीच्या पाइपलाइनचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आतापर्यंत नऊ भूसंपादन अधिकारी बदलले. मात्र, अजूनही शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत. आता बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे वाढून मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’’

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आंदोलन करून टोलनाका बंद केला होता. याबाबत अतुल बेनके यांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केली. या वेळी पांडुरंग पवार, शरद लेंडे, देवदत्त निकम, गुलाब नेहरकर, गोविंद बोरचटे, अकबर पठाण, मुकेश वाजगे यांची भाषणे झाली.

दोन-तीन दिवसांत बैठक होणार
सरकारच्या वतीने जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलल्याशिवाय येथून हलणार नाही, अशी भूमिका अतुल बेनके यांनी घेतल्याने, संबंधितांशी बोलणे झाल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत याविषयी तातडीची बैठक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

Web Title: Chalakwadi Tollnaka NCP Attack