फरार गुन्हेगार शोधण्याचे आव्हान

मिलिंद संगई
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

बारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे. दैनंदिन कामकाज सांभाळून या फरार व्यक्तींचा शोध घेण्याची कसरत सध्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोधपथकांकडून सुरू आहे. 

बारामती शहर - जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अडीच हजारांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण पोलिसांपुढे उभे आहे. दैनंदिन कामकाज सांभाळून या फरार व्यक्तींचा शोध घेण्याची कसरत सध्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोधपथकांकडून सुरू आहे. 

नूतन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी विविध गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या फरारी व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश नुकतेच सर्व पोलिसांना दिले आहेत. मात्र प्राप्त माहितीनुसार, पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत तब्बल २५८८ व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान आहे. या यादीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांत सहभागी, मात्र घटना घडल्यापासून फरारी असलेल्यांचा समावेश आहे. यातही काही गुन्हे तर तब्बल १९६० ते १९७० च्या दशकातीलही आहेत. यातही अनेक व्यक्ती जिवंत आहेत की नाहीत, हेही पोलिसांना समजायला मार्ग नसल्याचे पुढे आले आहे. 

खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, हाणामारी, दरोडा यापासून ते सरकारी कामात अडथळा यासह अनेक कलमान्वये आरोप निश्‍चित करण्यात आलेल्या फरारी व्यक्तींमागे सध्या जिल्हा पोलिस दल आहे. अर्थात दैनंदिन कामकाज, बंदोबस्त, अपुरे मनुष्यबळ, वाहनांची कमतरता, माहितीचा अभाव, कुचकामी गुप्तचर यंत्रणा या अडचणींवर मात करत पोलिस हे काम करत असल्याने साहजिकच या शोधमोहिमेवरही मर्यादाच आलेल्या आहेत. या फरारी व्यक्तींमध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

काही खटले न्यायालयाकडून रद्द
चुकीची नावे, तसेच चुकीचा पत्ता ही या शोधमोहिमेतील सर्वांत मोठी अडचण असून, अनेकांच्या नावासमोर लिहिलेली कलमेही चुकीची असल्याचे नंतर निष्पन्न होत आहे. याशिवाय अनेक वर्षे संबंधित व्यक्ती सापडत नसल्याने काही खटलेही न्यायालयाने रद्दबातल ठरवलेले असून, त्याची माहितीही पोलिसांना मिळत नसल्याने पोलिसांपुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Web Title: Challenge of finding absconding criminals