VidhanSabha 2019 : उद्योगनगरीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

VidhanSabha 2019 : उद्योगनगरीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

पिंपरी (पुणे) : बहुतांश शाळांनी रविवारपासून दिवाळी सुटी जाहीर केली आहे. शिवाय, शनिवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड, भोसरीसह लगतच्या मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक विभागासह राजकीय पक्षांपुढे आहे. 

मतदान केंद्र असलेल्या शाळांच्या मैदानांवर पावसामुळे चिखल झाला आहे. शिवाय, शालेय सत्रांत परीक्षा शनिवारी (ता. 19) संपल्याने बहुतांश शाळांची दीर्घकालीन दिवाळी सुटी सुरू झाली आहे. काही कंपन्यांनी कामगारांना रविवारला (ता. 20) जोडून सुटी दिली आहे. सोमवारी (ता. 21) मतदानाच्या दिवशीसुद्धा पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राजकीय पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत. 

निवडणूक विभागाची तयारी 
मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती मोहीम राबविली आहे. प्रभातफेरी काढल्या आहेत. भित्तिपत्रके, पथनाट्याद्वारे प्रबोधन व जाहिरातींद्वारे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदारांपर्यंत "व्होटर स्लीप' पोचविण्यात आल्या आहेत. उर्वरित मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांबाहेर "व्होटर स्लीप' देण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी मतदार केंद्रांवर स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. 

हे ओळखपत्रही चालेल 
मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), सरकारी आस्थापनांचे ओळखपत्र, छायाचित्र असलेले बॅंक पासबुक, पॅनकार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचे स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड, केंद्रीय श्रम मंत्रालयाचे आरोग्य विमा ओळखपत्र, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन कागदपत्र आदींपैकी एक पुरावा दाखवून मतदान करता येणार आहे. केवळ व्होटर स्लीपद्वारे मतदान करता येणार नाही. त्यासाठी वरीलपैकी एक पुरावा देणे बंधनकारक आहे. 

व्होटर स्लीपवर गुगल मॅप 
बदललेल्या मतदान केंद्रांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी माहिती देणारे फलक लावले आहेत. व्होटर स्लीपवर मतदान केंद्रांचा पत्ता आणि गुगल मॅप दिला आहे. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती समजणार आहे. 

पिंपरीत सर्वाधिक उमेदवार 
सर्वाधिक 18 उमेदवार पिंपरी मतदारसंघात आहेत. चिंचवडमध्ये 11 व भोसरीत 12 जण रिंगणात आहेत. 
राजकीय पक्षांव्यतिरिक्त अपक्षांचा भरणा अधिक आहे. त्यातील चिंचवड व भोसरीतील दोन अपक्षांना एका राजकीय पक्षाने पुरस्कृत केले आहे. मात्र, रिंगणातील अधिकृत उमेदवारांना अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभागणीची चिंता आहे. त्यांचा फटका कोणाला बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 

पोलिस सज्ज 
निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. यात आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह पाच उपायुक्त, 15 सहायक आयुक्त, 60 निरीक्षक, 329 सहायक व उपनिरिक्षक आणि 3,892 कर्मचारी आणि 1200 गृहरक्षक दलाचे जवान तैनात आहेत. शिवाय, राज्य व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही शहरात दाखल झाल्या आहेत. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com