अनुभवी चेहऱ्यांसमोर नव्या उमेदवारांचे आव्हान

अनुभवी चेहऱ्यांसमोर नव्या उमेदवारांचे आव्हान

नगरसेवकपद अनुभवलेल्या उमेदवारांसमोर नव्या चेहऱ्यांचे आणि नव्या ताकदीने रिंगणात उतरलेल्या जुन्या उमेदवारांचे आव्हान... निवडणुकीच्या रिंगणात न उतरता काँग्रेसचे नेते ॲड. अभय छाजेड यांनी युवराज शहा या नव्या चेहऱ्याला दिलेली संधी... मागील निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता शिवसेनेकडून लढणारे बाळासाहेब अटल... अशा बदलांमुळे सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर या प्रभागात ‘आता कोण जिंकणार’ अशी चर्चा रंगली आहे.

सॅलिसबरी पार्क-महर्षीनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे, तर शिवसेना, भारतीय जनता पार्टीने चारही जागांवर आपापले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, मनसेला दोनच जागांवर उमेदवार देता आले. याआधी भाजपच्या मनीषा चोरबेले, श्रीनाथ भिमाले आणि कविता वैरागे यांनी नगरसेवक म्हणून येथे काम केले आहे. चोरबेले यांच्याऐवजी यंदा त्यांचे पती पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांना पक्षाने संधी दिली आहे. या अनुभवी चेहऱ्यासमोर आता नव्या आणि पूर्वी पराभव स्वीकाराव्या लागलेल्या उमेदवारांचे आव्हान आहे.

‘अ’मध्ये काँग्रेसच्या शर्वरी गोतारणे, भाजपच्या कविता वैरागे, शिवसेनेच्या शीतल खुडे आणि मनसेच्या सीमा तिंडे या उमेदवारांमध्ये, तर ‘ब’मध्ये काँग्रेसचे सादिक लुकडे, भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे एकनाथ ढोले यांच्यात लढत रंगणार आहे. ‘क’मध्ये राष्ट्रवादीच्या श्‍वेता होनराव, भाजपच्या राजश्री शिळीमकर, शिवसेनेच्या अश्‍विनी राऊत, तर ‘ड’मध्ये भाजपचे प्रवीण चोरबेले, काँग्रेसचे युवराज शहा, शिवसेनेचे बाळासाहेब अटल आणि मनसेचे सलीम सय्यद हे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

स्वारगेट चौकापासून हा प्रभाग सुरू होतो. यात प्रेमनगर, आदिनाथ सोसायटी, सुजय गार्डन, मुकुंदनगर, महर्षीनगर, मार्केट यार्डचा काही भाग, डीएडी कॉलनी, लुल्लानगर चौक, माणिकचंद मलबार, गोळीबार मैदानाजवळील परिसर, मीरा सोसायटी, पूनावाला गार्डन, डायस प्लॉट, औद्योगिक वसाहत हा महत्त्वाचा भाग येतो. चोरबेले, वैरागे आणि भिमाले यांच्या जुन्या प्रभागाचा संपूर्ण आणि छाजेड यांच्याही जुन्या प्रभागाचा संपूर्ण समावेश नव्या प्रभागात झाला आहे. सुमारे ७० टक्के झोपडपट्टी आणि ३० टक्के सोसायट्यांचा भाग या प्रभागात येतो. येथे जैन समाज, मुस्लिम, मराठा, ब्राह्मण, ख्रिश्‍चन, अन्य मागासवर्गीस समाजातील मतदारांचे प्राबल्य आहे.  

या प्रभागात भाजपचे बळ जास्त आहे. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही निवडणुकांत चांगले मतदान झाले आहे. काँग्रेसला मत देणारा परंपरागत मतदारही येथे आहे. शिवसेनेने आणि मनसेने संघटनात्मक बांधणीवर गेल्या काही वर्षांपासून लक्ष दिले होते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा प्रचार जोरात सुरू आहे. मतदारांच्या गाठीभेटी, पत्रकांचे वाटप यावर उमेदवारांनी भर दिल्याचे दिसते. भाजपच्या कसलेल्या उमेदवारांचे इतरांसमोर आव्हान राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com