चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीत कुलधर्म-कुलाचारासाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

जेजुरी - चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरीत खंडोबाच्या कुलधर्म कुलाचारासाठी गुरुवारी (ता. १३) गर्दी झाली होती. दिवसभर भाविक खंडोबाचे दर्शन घेत होते. वांगे भरीत व भाकरीच्या महाप्रसादासाठी गडावर रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन लाख भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ घेतला.

जेजुरी - चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरीत खंडोबाच्या कुलधर्म कुलाचारासाठी गुरुवारी (ता. १३) गर्दी झाली होती. दिवसभर भाविक खंडोबाचे दर्शन घेत होते. वांगे भरीत व भाकरीच्या महाप्रसादासाठी गडावर रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन लाख भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ घेतला.

देवदिवाळी ते चंपाषष्ठी या सहा दिवसांच्या काळात खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव खंडोबाच्या ठिकाणी साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला खंडोबा गडावर घट बसले. षष्ठीला घट उठतात. गुरुवारी पहाटे पाच वाजता नेहमीची पूजा झाली. या वेळी धार्मिक विधी करीत सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात तासभर घट उठविण्याचा विधी सुरू होता. त्यानंतर उत्सवमूर्तींना भंडारगृहात ठेवण्यात आले. चंपाषष्ठीचा दिवस कुलधर्म कुलाचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. घरोघरी तळी भरली जाते. अनेक भाविक जेजुरीच्या खंडोबाला घरातील देव घेऊन भेटायला येत होते.

अनेकांनी नवीन टाक तयार करून घेतले तर काहींनी उजळून घेतले. गडावर, पायरी मार्गावर, चिंचबागेत, शहरातील पुजाऱ्यांच्या घरी कुलधर्म कुलाचाराचे कार्यक्रम सुरू होते. अनेक भाविक दिवटी पेटवून गडावर येत होते. पायरीवर उभे राहून भंडारा उधळण्याचा कुलाचारही अनेक भाविक करीत होते. गडाच्या ओवऱ्यातून व भंडारगृहाजवळ तळी भरण्याचे काम दिवसभर सुरू होते. भाविक रांगा लावून खंडोबाचे दर्शन घेत होते. घरातील देव मांडून तेथे तळी भरली जात होती. वर्ज्य केलेले भरीत व कांदा चंपाषष्टीनंतर खाण्यासाठी सुरवात करतात. परंपरेनुसार खंडोबाला वांगे भरीत व भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. जेजुरीच्या खंडोबा गडावरही भाजी व भाकरीचा महाप्रसाद केला होता. सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पुजारी सेवक वर्ग, ग्रामस्थ व देवसंस्थानचे कर्मचारी पुजारी सेवक वर्गाच्या वतीने सहा दिवस दररोज सकाळी मसाला दुधाचे वाटप भाविकांना केले जात होते. तेलवन व हळदीचा कार्यक्रम असतो. बुधवारी रात्री गडावर खंडोबाच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यासाठी तेलहंडा फिरविण्यात आला होता. महाद्वार रस्ता, चिंचबाग, कडेपठार रस्ता या ठिकाणी भाविकांनी गर्दी झाली होती.

Web Title: Champashasti Jejuri Celebration