पिंपरी शहरात 'चंडीगड पॅटर्न'

मिलिंद वैद्य : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पिंपरी - येत्या काही वर्षांत शहराची पाण्याची गरज आणखी वाढणार आहे. सध्या आहे ते पाणी पुरेसे वाटत असले, तरी कालांतराने टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. हे ओळखून महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराचा "मास्टर प्लॅन' हाती घेतला आहे. भारतात फक्त चंडीगड येथे हा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्याचा अभ्यास करून पिंपरी- चिंचवड महापालिकेने हा पॅटर्न राबविण्याचे ठरविले आहे.

पिंपरी - येत्या काही वर्षांत शहराची पाण्याची गरज आणखी वाढणार आहे. सध्या आहे ते पाणी पुरेसे वाटत असले, तरी कालांतराने टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. हे ओळखून महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराचा "मास्टर प्लॅन' हाती घेतला आहे. भारतात फक्त चंडीगड येथे हा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्याचा अभ्यास करून पिंपरी- चिंचवड महापालिकेने हा पॅटर्न राबविण्याचे ठरविले आहे.

शहराला पवना धरणातून पिण्यासाठी दररोज 450 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरविले जाते. त्यातील वीस टक्के पाण्याची गळती होते. वापरलेल्या पाण्यातून सुमारे 80 टक्के म्हणजे 280 ते 290 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. पूर्वी हे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असे. त्यामुळे "पवना' व "इंद्रायणी'चे प्रदूषण वाढले होते; परंतु गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने ठिकठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (वॉटर ट्रीटमेंट प्लॅंट) उभे करून त्यावर प्रक्रिया सुरू केली. सध्या शहरात एकूण तेरा प्रकल्प असून, त्यातील बारा कार्यान्वित आहेत. त्याद्वारे दररोज 240 ते 250 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया केलेले पाच दशलक्ष लिटर पाणी लष्कराच्या डेअरी फार्मसाठी, दहा दशलक्ष लिटर पाणी सीएमईच्या आंतरराष्ट्रीय रोइंग चॅनलसाठी दिले जाते. उर्वरित पाणी नदीपात्रात सोडून दिल्याने ते वाया जाते. शहरातील छोटेमोठे उद्योग, वॉशिंग सेंटर्स, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॅंडस्केप गार्डन, इतर उद्याने, रस्ता दुभाजकावरील झाडे, हिरवळ यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. यातील वॉशिंग सेंटर, सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी; तर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य केला जाणार आहे. याशिवाय वायसीएम रुग्णालयात दररोज पाच ते सात लाख लिटर सांडपाणी तयार होते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तेथे यंत्रणा बसविण्यात आली असून, ती गेल्या जुलैपासून कार्यान्वित झाली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेने जुन्या प्रभाग क्रमांक 12 या मॉडेल वॉर्डमध्ये असलेल्या सुमारे 70 गृहनिर्माण सोसायट्यांकरिता पाण्याच्या पुनर्वापराची योजना हाती घेतली असून, त्याच्या स्वतंत्र जलवाहिनीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. इलेक्‍ट्रिकची कामे पूर्ण होताच या सर्व सोसायट्यांमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर सुरू केला जाणार आहे. महिनाभरात ही योजना कार्यान्वित होणार आहे.
महापालिकेने बोपखेल, ताथवडे, पिंपळे निलख, चऱ्होली, चिखली येथे आणखी पाच प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

काय आहे चंडीगड पॅटर्न-

 • * शहरातील पूर्ण सांडपाण्यावर होते प्रक्रिया
 • * स्वच्छ केलेल्या पाण्याचा 100 टक्के पुनर्वापर
 • * सर्व्हिस स्टेशन, बस डेपो, व्यापार-उद्योगसंस्था
 • यांना पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य
 • * खासगी गृहनिर्माण संस्थांचा सहभाग
 • * पुनर्वापराच्या पाण्याची स्वतंत्र वितरण व्यवस्था

पिंपरी-चिंचवड महापालिका काय करणार

 • * पूर्ण सांडपाण्यावर करणार प्रक्रिया
 • * वितरणासाठी स्वतंत्र जलवाहिनी, साठवण यंत्रणा उभारणार
 • * सर्व्हिस स्टेशन, पिंपरी- चिंचवड एमआयडीसी, चाकण, तळेगाव
 • येथील कंपन्यांना प्रक्रिया केलेले पाणी पुरविणार
 • * खासगी संस्था, गृहनिर्माण संस्थांचा सहभाग वाढविणार
 • * एमआयडीसीच्या मदतीने वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करणार
 • * वीज प्रकल्पासाठी कचऱ्यापासून तयार केलेले इंधन पुरविणार
 • * कचरा विघटनाचा प्रश्‍नही सुटणार

प्रकल्पासाठी एमआयडीसीला पाणी स्वस्तात खरेदी करण्याचा व वीजनिर्मितीसाठी जागेचा प्रस्ताव दिला आहे. प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार होत असून, त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. प्रकल्प यशस्वी झाल्यावर पिंपरी- चिंचवड शहर देशातील पहिली "इको-सिटी' ठरेल.

- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग

Web Title: Chandigarh pattern in Pune