
Chandrakant Patil : विरोधकांनो कसबा आणि कर्नाटकच्या विजयाने हुरळून जाऊ नका, एकटे मोदी तुम्हाला पुरुन उरतील; चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil - 'देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट काम चालू आहे.त्यामुळे विरोधकांनो कसबा आणि कर्नाटकच्या विजयाने हुरळून जाऊ नका,
एकटे मोदी तुम्हाला पुरुन उरतील', असे विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्र संघटक-सचिव दत्तात्रेय कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत आहे. अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून नागरिकांना त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत.
सामान्य लोक मोदींचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला ओळखत आहेत. त्यामुळे विरोधकांनो एखाददुसरा विजय मिळाला म्हणून हुरळून जाऊ नका एकटे मोदी तुम्हाला पुरुन उरतील असे पाटील म्हणाले. तसेच जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी असा सल्लाही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी बोलताना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणाले की,'या भागातील विकासकामांसाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. मुख्य सिंहगड रस्त्याच्या कामासाठीही चंद्रकांतदादा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना निधी मंजूर झाला होता.
सध्याही मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. या जनसंपर्क कार्यालयात मी महिन्यातून एकदा नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी उपस्थित असणार आहे." यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, भारतीय जनता पक्षाचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, अनिल मते यांसह पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील व माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
कचरा उचलून घ्या अगोदर! कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आयोजकांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा भेट देऊन चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिमेभोवती असलेला वर्तमान पत्राचा कव्हर फाडून एक कार्यकर्ता खाली टाकत होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले सत्कार थांबवा अगोदर ते खाली टाकलेले सर्व कागदाचे तुकडे उचलून घ्या! सर्व कचरा उचलून झाल्यानंतर पाटील यांनी आयोजकांच्या हस्ते सत्कार स्वीकारला.