मतदारसंघात ‘दादां’चा गाठीभेटीवर भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी असताना त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे, यासाठी ‘दादां’नी आज गाठीभेटीवर जोर दिला.

पुणे - कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी असताना त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे, यासाठी ‘दादां’नी आज गाठीभेटीवर जोर दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय मोतीबागेसह कोथरूडमधील मतदार असलेल्या मान्यवरांच्या घरी जाऊन त्यांनी खास भेट घेतली.

दुपारी पाटील यांनी मोतीबागेत जाऊन भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या वेळी तेथे उपस्थित प्रचारकांशी चर्चा केली. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. कोथरूड येथील आशिष गार्डनच्या मेळाव्याला जाण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपचे नगरसेवक राजेश बराटे, सुशील मेंगडे यांच्या मंडळात जाऊन आरती केली. गोसावीवस्ती येथे दीपक पोटे, मंजूश्री खर्डेकर, जयंत भावे या भाजप नगरसेवकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचीही भेट घेतली. मेळाव्यानंतर खर्डेकर यांच्या नवरात्र मंडळाला भेट देऊन देवीची आरती केली.

प्रवीण तरडे यांची भेट
प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे हे कोथरूडमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढणार असून, ते गुरुवारी (ता. ३) शेट्टी यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र, चंद्रकांत पाटील आणि तरडे यांची आज भेट झाल्याने आता तरडे काय निर्णय घेणार, हे शेट्टी यांच्या भेटीनंतर कळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil meet pravin tarde