
Chandrakant Patil : उद्धव ठाकरे - फडणवीस एकत्र येणार? पाटील म्हणाले, "राजकारणात कुठल्याही पहाटे..."
Chandrakant Patil : शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह आहे. उद्धव ठाकरे सरकार गमावल्यानंतर स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत आहेत. शिवसेना फोडण्यामागे भाजपचा मोठा हात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध कटू आहेत.
मात्र गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत वेगळेच दृश्य पाहायला मिळाले होते. विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले. दोघेही बोलतांना हसताना दिसले आणि बराच वेळ गप्पा मारत राहिले होते.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा बदल होणार का?, अशी चर्चा राजकीय वर्चतुळात रंगली आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि फडणवीस परत एकत्र येण्याच्या कुठेही चर्चा नाहीत. बंद खोलीत पण चर्चा नाही आणि ओपन गार्डनमध्ये पण नाही, सुतावरून काही परीक्षण केलं जातंय, असा काही चान्स नाहीत, पण राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकत."
पुण्यातील वृक्षतोडीवर देखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्याच मी एकूण महापालिका जोडलेल्या प्रोजेक्ट बाबत ६ बैठकी उद्या लावल्या आहेत. यात मेट्रो २४ बाय ७ या सगळया बैठकी घेणार आहे त्यात झाडे तोड विषय पण घेणार आहोत.
विरोधक ईव्हीएम विरोधात एकत्र आले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक देखील झाली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आमचा विजय झाला तर त्यांना ईव्हीएम आठवते. कसबा जिंकले तर त्यांना ईव्हीएम आठवले नाही का?
मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेचे उर्दूमध्ये पोस्टर लागल्यामुळे टीका होत आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागणे हे काय लगेच हिंदुत्व सोडलं अस नाही. मुस्लिम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केलं असेल म्हणून मालेगाव मध्ये बोर्ड लागले असतील"