Anil-Bhardwaj
Anil-Bhardwaj

"चांद्रयान-2'मुळे नवीन माहिती जगासमोर  - डॉ. भारद्वाज

पुणे - "चांद्रयान-2'चे लॅंडर विक्रम हे अपयशी ठरले असले, तरी चंद्राभोवती फिरणारे ऑर्बिटर अजून कार्यरत आहे. त्यावर बसविण्यात आलेली आठ संयंत्रे चंद्राच्या पृष्ठभागासह तेथील वातावरणाची सखोल माहिती पुरविण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अनेक नवीन माहिती जगासमोर येत आहे, असे प्रतिपादन "इस्रो'च्या भौतिकी संशोधन प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांनी केले. 

भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे आदी उपस्थित होते.

डॉ. भारद्वाज म्हणाले, ""ऑर्बिटरवर बसविण्यात आलेल्या उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यामुळे 25 मीटर लांबी असलेली वस्तू सहज पाहू शकतो. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरांची थ्री-डी स्वरूपात माहिती उपलब्ध होत आहे. सौरवादळाचा आणि पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राचे चंद्राच्या वातावरणावर होणारे परिणाम नव्याने समोर येत आहेत. यामुळे आधीची गृहीतके मोडीत निघत आहेत.'' भविष्यात येऊ घातलेल्या "इस्रो'च्या मोहिमांचा ओझरता उल्लेख त्यांनी या वेळी केला. 

डॉ. मांडे म्हणाले, ""संशोधनाच्या क्षेत्रात आपण आजपर्यंत स्पर्धेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करीत होतो. पण, आता संशोधन क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी आपल्याला आहे. यासाठी आपल्याला संशोधन संस्था, संशोधक, प्रशासन सर्वांना एकाच दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.'' सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळा संशोधनाला आवश्‍यक ती मदत पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. 

"इस्त्रो'ची आता सूर्यावर स्वारी 
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आता मंगळ, शुक्रासह सूर्यावरील मोहिमेची आखणी करीत आहे. पुढील वर्षी "आदित्य एल-1' ही सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करणारी मोहीम आखण्यात आली असून, 2023-24 पर्यंत मंगळ आणि शुक्र ग्रहावर उपग्रह मोहिमेचे नियोजन आहे. "मंगळयान-2'द्वारे मंगळाच्या पृष्ठभागावरील बदलते वातावरण, मोठी वादळे यांची सखोल माहिती मिळविण्याचा प्रयत्न होणार आहे. शुक्र ग्रहाच्या अनभिज्ञ पृष्ठभागाबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न मोहिमेद्वारे होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com