अर्थकारणच पालटणार

अर्थकारणच पालटणार

अडथळ्यांची प्रदीर्घ शर्यत पार करून अखेर पुण्यातील मेट्रोच्या शनिवारी होत असलेल्या भूमिपूजनाकडे पुणेकर नागरिकांची केवळ येण्या-जाण्याची आणखी एक व्यवस्था म्हणून पाहात वासलात लावता येणार नाही, तर संपूर्ण महानगराचे अर्थकारणच पालटून टाकण्याचे सामर्थ्य त्यात असणार आहे. राहणीमान, जगण्याचा स्तर आणि आर्थिक उत्पन्न या निकषांवर पुणेकरांना श्रीमंत- समृद्ध करणारी म्हणून मेट्रोकडे पाहावे लागेल.

मेट्रो या संकल्पनेला विरोध करणारे विरोध करत राहोत. ‘आधी पीएमपी सुधारा, मग मेट्रो आणा,’ किंवा ‘पीएमपी सुधारली की मेट्रोची गरजच उरणार नाही,’ अशा प्रकारच्या शेलक्‍या प्रतिक्रिया अधूनमधून व्यक्त होतात आणि त्यात प्रारंभिक सुसंगती असल्याने त्यावर पटकन विश्‍वासही बसतो. मात्र, ही सुसंगती सार्वजनिक वाहतुकीच्या एकंदर प्रवासातील पहिले काही मैल खरी असते; पण दीर्घ टप्प्यात ती निरुपयोगी ठरते. शहराचे महानगर होताना त्यातील
लोकसंख्या वाढतेच; पण त्याचबरोबर तिची घनताही त्यापेक्षा अधिक गतीने वाढत जाते. कमी जागेत लोकसंख्येची अधिक घनता हे आधुनिक नगरनियोजनाचे तत्त्व असल्याने अशी घनता असलेल्या महानगरांसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अवलंब करावा लागतो. महानगर कसे वाढत आहे हे पाहून ते कसे वाढू दिले पाहिजे, याचे नियोजन करण्याची गरज असते. या वाढत्या महानगरातील सर्वांत कळीची आणि महत्त्वाची समस्या असते ती वाहतुकीची; रहिवाशांना सकाळी कामावर नेणाऱ्या आणि संध्याकाळी परत आणणाऱ्या साधनांची. एकतर कामाचे आणि राहण्याचे अंतर कमीकमी करण्याचे नगरनियोजन एका बाजूने होत असताना, दुसरीकडे तरीही उरणाऱ्या वाहतुकीच्या गरजेसाठी खासगी वाहनांचा वापर टाळण्याचा आणि सार्वजनिक वाहतुकीचा टक्का वाढविण्याचा कार्यक्रम आखला जाणे आवश्‍यक ठरते. सायकली- दुचाकी- मोटारी यांचा वापर बंद करून साध्या बसचा वापर वाढविला पाहिजे, हे मान्यच आहे. मात्र, जेव्हा एका दिशेने एका तासाला आठ हजारांपेक्षा अधिक प्रवासी जाऊ इच्छितात, तेव्हा साधी बस अपुरी पडू लागते. पंधरा हजारांपर्यंत प्रवाशांसाठी बीआरटी आणि पंचवीस हजारांपासून ते एक लाख प्रवाशांपर्यंत मेट्रोचे वेगवेगळे प्रकार गरजेचे ठरतात. मेट्रो हा सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतील सर्वांत जालीम, शेवटचा रामबाण उपाय आहे आणि तो पुणे महानगरात आणण्याची वेळ कधीच आली आहे.  मेट्रोच्या मार्गावरील प्रवासी संख्या मेट्रोच्या क्षमतेपेक्षा कमी असल्याने मेट्रो तोट्यात जाईल, हा विरोधाचा मुद्दाही आता पुन्हा तपासून घ्यायला हवा. या मार्गांवरील सध्याच्या प्रवाशांच्या संख्येत सध्याच्या रडतखडत, हालयुक्त पीएमपीपेक्षा सुखद, वेगवान, सुरक्षित, प्रदूषणमुक्त मेट्रोसारखी सुविधा मिळाल्यानंतर खासगी वाहनांकडून याकडे वळणाऱ्या प्रवाशांची संख्या मिळवावी लागेल.                 

मेट्रोचे दोनच मार्ग सगळ्या शहराची वाहतूक समस्या कशी सोडविणार, हा प्रश्‍नही नकारात्मक वृत्तीच दाखवतो. एकतर हे दोन मार्ग केवळ दोन टोकांवरील प्रवाशांची सोय करीत नाहीत, तर ते जंक्‍शनने एकमेकांना छेदणार असल्याने एकंदर चारपेक्षा अधिक मार्ग खुले होतात. म्हणजेच केवळ स्वारगेटचा प्रवासी पिंपरीला आणि कोथरूडचा रामवाडीला जाणार नाही, तर स्वारगेटचा प्रवासी कोथरूडला आणि रामवाडीचा प्रवासी पिंपरीलाही जाऊ शकेल. तसेच, पहिल्या दोन मार्गांना लागलेला वेळ पुढच्या मार्गांना लागणार नाही. हे दोन मार्ग होईपर्यंत हिंजवडी- शिवाजीनगर हा पीएमआरडीएचा मार्गही होऊन पुढे दिल्ली मेट्रोच्या प्रकल्प अहवालातील पुढच्या हडपसरसह आणखी चार मार्गांना गती मिळेल. अर्थात, सार्वजनिक वाहतुकीचा भार केवळ मेट्रो पेलेल, अशीही अपेक्षा मूर्खपणाची ठरेल. सायकल, साधी बस, बीआरटी, एचसीएमटीआर अर्थात अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यावरील मोनोरेल, तसेच बाह्य वर्तुळाकार रस्ता यांची एकात्मिक रचना असायला हवी. या रचनेमुळे पुणेकरांच्या वेगात वाढ होऊन दरडोई उत्पन्नही वाढेल. नव्या बाजारपेठा, निवासी संकुले विकसित होऊन शहराच्या अर्थकारणालाच गती मिळेल. त्यामुळे पुणेकरांनी सकारात्मकतेने मेट्रोचे स्वागत करायला हवे...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com