महापौर बदलाचे औत्सुक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पुणे : महापौर नितीन काळजे यांना पद सोडावे लागणार का आणि तसे घडल्यास त्यांची जागा पक्षांतर्गत कोणत्या गटाला मिळणार, हाच मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात औत्सुक्‍याने चर्चिला जात आहे. संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढील आठवड्यात शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर या हालचालीला वेग येण्याची शक्‍यता आहे. 

पुणे : महापौर नितीन काळजे यांना पद सोडावे लागणार का आणि तसे घडल्यास त्यांची जागा पक्षांतर्गत कोणत्या गटाला मिळणार, हाच मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात औत्सुक्‍याने चर्चिला जात आहे. संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढील आठवड्यात शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर या हालचालीला वेग येण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेत महापौर बदलण्याच्या वेळीच उपमहापौरही नवीन नियुक्त होईल. सभागृह नेतेही बदलणार का, याबाबतही पक्षात परस्परविरोधी मते व्यक्त होत आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षांची मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवड झाल्यापासूनच महापौर बदलाची चर्चा सुरू झाली. त्या वेळी आमदार महेश लांडगे यांच्या गटाला स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यामुळे काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे दिला होता. स्थायी समिती अध्यक्षपदाचे इच्छुक राहुल जाधव यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते आता लांडगे गटाकडून महापौर पदासाठी इच्छुक आहेत. 

महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षासाठी आहे. मात्र, सव्वा वर्षाचा कालावधी देऊन दोघांना महापौर करण्याचे गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीनंतर ठरले होते. काळजे यांच्या कारकिर्दीला 15 जून रोजी सव्वा वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे त्यांनी पद सोडण्याची मानसिक तयारी केली आहे. 

महापौर पद जगताप यांच्या समर्थकाला मिळणार, की लांडगे गटाकडे जाणार, हा खरा पक्षांतर्गत प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. जगताप गटाच्या समर्थक ममता गायकवाड या स्थायी समितीच्या अध्यक्षा आहेत. सलग दुसऱ्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद जगताप गटाकडे आहे. मात्र, पूर्वीच्या अध्यक्षा सीमा सावळे आमच्या गटाच्या नाहीत, त्यांना थेट मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केले होते, अशी भूमिका जगताप समर्थक घेत आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षी महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष ही तिन्ही महत्त्वाची पदे भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना मिळाली. त्यामुळे या वर्षीची पदे चिंचवड मतदारसंघाकडे असावीत, अशी भूमिका जगताप समर्थकांची आहे. 

जगताप आणि लांडगे हे दोघेही लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना समर्थकांकडे महापालिकेत पदे असणे महत्त्वाचे वाटते. शेवटच्या क्षणी स्थायी समितीचे अध्यक्षपद गेल्यामुळे लांडगे गट सावध झाला आहे. महापौरपद त्यांच्या गटाला मिळविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. लांडगे समर्थक नितीन काळजे यांनीही लांडगे यांनी सांगितल्याशिवाय राजीनामा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुढील महापौराचे नाव ठरल्याशिवाय सध्याचा तिढा सुटण्याची शक्‍यता कमी आहे. 

काळजेंना कार्यकाळ वाढवून मिळेल? 
राज्यातील आठ महापालिकांमध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये आठ महापौर झाले. पक्षाला निर्णय घेताना सर्व ठिकाणी बदल करावे लागतील. महापौर बदलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारसे इच्छुक नसल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्याच पद्धतीची भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी (ता. 29) पुण्यात महापौर बदलाबाबत घेतली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी बदलण्यासंदर्भात नागपूर विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत नऊ जुलैनंतरच शहरातील आमदारांची आणि पक्षश्रेष्ठींची चर्चा होण्याची शक्‍यता आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास काळजे यांना आणखी सव्वा वर्षाचा कालावधी मिळण्याची शक्‍यता आहे. 
 

Web Title: change of mayor