टेकडीफोडमुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाहच बदलले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

कात्रज परिसरातील टेकड्यांवर अनधिकृत बांधकामे
पुणे - कात्रज परिसरात डोंगरमाथा आणि उतारांवर बेसुमार टेकडीफोड सुरू असून, तेथे अनधिकृतपणे घरे आणि बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाहच बदलले असून, भविष्यात मोठी हानी होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कात्रज परिसरातील टेकड्यांवर अनधिकृत बांधकामे
पुणे - कात्रज परिसरात डोंगरमाथा आणि उतारांवर बेसुमार टेकडीफोड सुरू असून, तेथे अनधिकृतपणे घरे आणि बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाहच बदलले असून, भविष्यात मोठी हानी होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कात्रज येथील मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी परिसरामधील टेकड्यांच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात घरे आणि बहुमजली इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून खाली वाहणाऱ्या पाण्याच्या वहनामध्ये अडथळे निर्माण होतात. काही वर्षांपूर्वीच कात्रज घाटात पावसाच्या गाळयुक्त पाण्याच्या प्रवाहात मायलेकींना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून डोंगरमाथा आणि उतारांवर बांधकामे करण्यास मज्जाव करण्यात आला. परंतु हा निर्णय केवळ धोरणात्मक पातळीवरच राहिला.

पर्यावरणप्रेमी सचिन पुणेकर म्हणाले, ""गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये बोरिंगचे प्रमाण वाढले आहे. उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने भूजल पातळी खालावत चालल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने नुकताच महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक पाण्याचे स्रोतही आटत आहेत. हे टेकडीफोड आणि अनधिकृत बांधकामांमुळेच होत आहे.''

टेकडीफोड आणि अनधिकृत बांधकामांमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यातूनच अनेक दुर्दैवी अपघात घडत आहेत. वृक्षतोड, टेकडीफोड आणि अनधिकृत बांधकामे यांच्यावर प्रशासनाने पायबंद घातला पाहिजे.
- माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

नागरिकांनो, स्वस्तात घरं मिळतात म्हणून आयुष्यातील कष्टाचा पैसा डोंगरमाथा किंवा उतारावरील बांधकामांमध्ये गुंतवून कुटुंबीयांचा जीव धोक्‍यात घालू नका. बिल्डरांच्या खोट्या जाहिरातींना भुलून ज्या बांधकामांच्या गुणवत्तेची कोणतीच हमी नाही, अशा घरांमध्ये राहायला जाऊ नका. पीएमआरडीएकडून पुढील आठवड्यात कात्रज परिसरातील अवैध टेकडीफोड आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.
- विकास भालेराव, तहसीलदार तथा सहायक नियंत्रक (अनधिकृत बांधकाम) पीएमआरडीए

Web Title: changed the natural of water flow by mountain burst