पोलिस व्हायचं स्वप्नं कसं पूर्ण होणार? (व्हिडिओ)

पोलिस व्हायचं स्वप्नं कसं पूर्ण होणार? (व्हिडिओ)

पुणे - आई-वडील शेतमजूर आहेत. त्यांनी बारावीपर्यंत कसेबसे शिकविले, पुढचं शिक्षण परवडेना म्हणून पोलिस व्हायचं ठरवलं. 2-3 वर्षे आई-बाप पोटाला चिमटा काढून माझ्यासाठी पैशांची तजवीज करतायेत. मीही शारीरिक चाचणीवर भर दिला. पण सरकारने ऐनवेळी शारीरिक गुण कमी करून लेखी परीक्षेला महत्त्व देत आमची संधीच हिरावून घेतली.

आता तुम्हीच सांगा पोलिस व्हायचं स्वप्न कसं पूर्ण होणार? आई-बापाला काय उत्तर द्यावं हृदय हेलावून टाकणारे हे प्रश्‍न उपस्थित केलेत, पोलिस भरतीसाठी दोन-तीन वर्षे धडपडणाऱ्या नगरच्या संजय निकमचे ! संजयसारख्या हजारो शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांच्या मुला-मुलांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून राज्य सरकारच्या फतव्याविरुद्ध निषेध नोंदविला. 

राज्य सरकारने नव्या निकषांनुसार पोलिस भरती करण्याचे जाहीर केले, त्याच्या निषेधार्थ हजारो तरुण - तरुणींनी आज शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 10 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. तर उर्वरित उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आपले मुद्दे पोटतिडकीने मांडले. त्यानंतर 10 विद्यार्थी आपल्या मागण्यांचे निवेदन घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे जाण्यासाठी धावत निघाले. दरम्यान, 11 फेब्रवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज 50 उमेदवार आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. 

करिअर म्हणून आम्ही पोलिस भरतीकडे बघतो. त्यासाठी मेहनत करतो. मात्र ऐनवेळी नवे निकष लादून सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. आमच्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याची झळ बसणार आहे. 
- महिला उमेदवार, करमाळा, सोलापूर 

नव्या निकषांत शारीरिक चाचणीला कमी आणि लेखी परीक्षेला जादा गुण दिले आहेत. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब कुटुंबातील मुले आपोआप पोलिस भरतीतून बाहेर फेकली जाणार आहेत. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा. 
- महेश धाडगे, शेंडी पोखर्डी, नगर 
 

उमेदवारांच्या मागण्या 
* पोलिस भरतीसंदर्भातील नवे निकष तातडीने रद्द करावेत 
* लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीला समान गुण द्यावेत 
* जागेनुसार एकास पंधरा उमेदवारांची निवड करावी 

काय आहे राज्य सरकारचा आदेश? 
आतापर्यंत पोलिस भरतीमध्ये लेखी परीक्षेस 100 व शारीरिक चाचणीसाठी 100 असे 200 गुण होते. नव्या निकषांनुसार सरकारने शारीरिक चाचणी 50 आणि लेखी परीक्षा 100 गुणांची ठेवली आहे. पोलिस दलात बुद्धीमान तरुण यावेत आणि शारीरिक चाचणीदरम्यान होणाऱ्या दुर्घटनांसाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने नमूद केले आहे. मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी उमेदवारांना फटका बसण्याचीच दाट शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com