पिंपळे निलख बदलतंय माझं

पिंपळे निलख बदलतंय माझं

पिंपरी - मुळा नदीच्या काठावरील कौलारू घरांचे टुमदार गाव. १९२७ मध्ये संरक्षण विभागाने जमिनी घेतल्या आणि औंध, सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड गावांशी संपर्क तुटला. नदी आणि संरक्षक विभागामुळे गाव बंदिस्त झालं. रोजगाराची साधनं कमी झाली. केवळ एकेरी रस्त्याने औंध- रावेत रस्त्याशी जोडलं गेलं; पण आता गाव बदलत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. शहरीकरणाची आस गावाने धरली आहे, अशी भावना साठे पिंपळे अर्थात पिंपळे निलख येथील नागरिकांनी व्यक्त केली. 

पिंपळे निलखच्या विकासासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुळा नदीवरील पुलामुळे बाणेरमार्गे पुणे व नाल्यावरील पुलामुळे वाकड-हिंजवडीशी ‘कनेक्‍ट’ झालं आहे. महापालिकेकडून विकासकामे वेगात सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, असता गावाचा कायापालट सांगताना त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, तरुणांच्याच हाती गावाचा विकास असल्याची भावनाही व्यक्त केली. कारण, हिंजवडी आयटी पार्कमधील आयटीयन्सच्या दृष्टीने पिंपळे निलख भाग सोयीचा आहे. त्यामुळे येथे उद्योग, व्यवसायासाठी मोठी संधीही उपलब्ध आहे. 

साधारणतः दहा वर्षांपूर्वी मुळा नदीवर उभारलेल्या पुलामुळे पुण्यातील बाणेरशी पिंपळे निलख जोडले गेले. कस्पटे चौकालगत नदीवर उभारलेल्या पुलामुळे बालेवाडी गावाशी जोडले जाणार आहे. तसेच, बाणेर पुलाजवळील चार एकर जागेत उद्यान विकसित केले जात आहे. रक्षक सोसायटी चौक ते गावठाणातील बापूजीबुवा मंदिरापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. त्याच्या दोन्ही बाजूस पदपथ उभारणीचे काम सुरू आहे. वाघजाई हॉटेल ते कस्पटे चौक रस्त्याचेही रुंदीकरण झालेले असून डांबरीकरण सुरू आहे. 

गावाची जमीन संरक्षण विभागात गेली तेव्हापासून गाव बंदिस्त झालं. रोजगाराचे साधनं गेली. आता रस्ते व पाण्याची सोय झाली आहे. विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे तरुणांना उद्योग, व्यवसायाची मोठी संधी आहे. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा.
- बाळासाहेब साठे, ज्येष्ठ नागरिक, पिंपळे निलख

प्रस्तावित कामे
महादेव मंदिर ते स्मशानभूमी दरम्यानचा सहाशे मीटर लांब रस्ता २४ मीटर रुंद होणार आहे. स्मशानभूमी विकसित केली जाणार आहे. कस्पटे चौक ते बालेवाडीतील लक्ष्मीमाता मंदिर यांना जोडण्यासाठी मुळा नदीवर पुणे महापालिकेने पूल उभारला आहे. त्याला दोन्ही बाजूला रस्त्यांना जोडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गावठाणातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण मंजूर आहे. क्रांतिनगर ते कस्पटे चौक दरम्यानचा रस्ता १२ मीटर रुंद करण्याचे नियोजन आहे. पाण्याची नवीन टाकी बांधण्यात येणार आहे. 

उपलब्ध निधी
सुरू असलेली कामे : १९ कोटी ८१ लाख
प्रस्तावित कामांसाठी : १२ कोटी ३७ लाख 
रस्त्यासाठी मिळणार : ३ कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com