चऱ्होलीत शाळांचे रूपडे पालटणार

Charholi-School
Charholi-School

पिंपरी - महापालिकेच्या चऱ्होली गावठाणासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील सहा शाळांच्या इमारत दुरुस्तीला मुहूर्त मिळाला आहे. वर्गखोल्यांची डागडुजी, छप्पर, संरक्षक भिंती, स्वच्छतागृहांची दुरुस्ती व रंगरंगोटी अशी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शाळांचे रूप पालटणार आहेत.

चऱ्होली गावठाणातील शाळेची इमारत सुमारे २५ वर्षे जुनी आहे. चोविसावाडीतील शाळेची इमारत २० वर्षांपूर्वीची आहे. वडमुखवाडी, काळजेवाडी, बुर्डेवस्ती, पठारेमळा येथील शाळा साधारणतः १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत. स्थानिक मुलांना शाळेसाठी अधिक अंतर पायपीट करावी लागू नये, यासाठी वाड्या- वस्त्यांवर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

चऱ्होली गावठाणातील शाळा पहिली ते चौथीपर्यंत असून, चोविसावाडीतील शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे. वडमुखवाडी, काळजेवाडी, बुर्डेवस्ती, पठारेमळा येथील शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहेत. 

चऱ्होली परिसरातील जवळपास सर्वच शाळांच्या इमारतींचा रंग उडाला आहे. काहींच्या भिंती व ओट्यांचे काँक्रिट, विटा, दगड निखळले आहेत. खेळाच्या मैदानांवर खड्डे पडलेले आहेत. संरक्षक भिंती मोडकळीस आल्या आहेत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता होती. महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाने शाळांच्या इमारतींसंदर्भातील प्रस्ताव पाठविला होता. शहर अभियंत्यांनी त्याला शिफारस दिली होती. शाळांमधील या कामांसाठी सुमारे ३० लाख रुपयांचा निधी महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला. त्यामुळे शाळांच्या इमारती, संरक्षक भिंतींची दुरुस्ती व सुधारणांचा मार्ग मोकळा झाला आहे. ही सर्व कामे श्रीकृपा एंटरप्रायजेसच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

चऱ्होली परिसरातील शाळांच्या इमारती साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीच्या आहेत. तेथील पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍या, खेळाची मैदाने, संरक्षक भिंती, स्वच्छतागृहे, छत यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक होते. ही कामे करून इमारती व वर्गखोल्यांची रंगरंगोटी केली जाणार आहे. 
- नितीन काळजे, माजी महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com