चासकमान धरणाच्या कालव्यातून मोठी गळती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

चास - चास (ता. खेड) व परिसरात चास-कमान धरणाच्या उजव्या कालव्याच्या गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात ओढे, नाले खळखळून वाहत आहेत. या पाण्यामुळे एकीकडे धबधबे कोसळत असताना दुसरीकडे कालव्यालगतचे शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. कालवा गळतीचे पाणी शेतांत पाझरत असल्याने जमिनी नापिक झाल्या आहेत, तसेच अनमोल असणाऱ्या पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर नासाडी होते आहे.

चास-कमान धरणातून २२ मार्च रोजी उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन ४५ दिवसांसाठी असताना ४५ दिवसांनंतर आवर्तन बंद न करता सलग दुसरे आवर्तन त्याला जोडून घेतल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोच आहे; पण कालव्याचे अस्तरीकरण रखडल्याने कालव्यातून आवर्तन सोडल्यावर होणाऱ्या कालवा गळतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. सुमारे ५४ दिवसांपासून कालव्याद्वारे आवर्तन सुरू आहे. चास येथे एका ओढ्यातून वाहणारे पाणी 

धबधब्याप्रमाणे कोसळते आहे. मात्र, पाण्यासाठी सर्वत्र दाहीदिशा फिरण्याची वेळ आलेल्या ठिकाणी पाण्याचे मोल कळत असले तरी चास-कमान कालव्यातून गळतीमुळे वाहून जाणाऱ्या लाखो लिटर पाण्याची होणारी नासाडी थांबवणार तरी कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

पाणीपट्टी भरणाराच बळीचा बकरा
कालवा गळतीने शेवटच्या टोकाला पाणी पोचण्यास उशीर होत आहे. खेड तालुक्‍यातील शेतकरी वीजपंपाच्या साह्याने पाणी उचलतात, त्यामुळे शेवटच्या टोकाला पाणी योग्य दाबाने पोचत नाही. त्यामुळे आवर्तन सोडल्यावर खेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या वीजपंपांची वीज खंडित करण्यात यावी, असा जावईशोध पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावल्याने चक्क शेतकऱ्यांचे वीजजोड तोडण्यात आले होते. म्हणजे मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी जो शेतकरी पाणीपट्टी भरतो आहे, त्यालाच बळीचा बकरा बनवल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: chasakman dam canal water leakage