‘चासकमान’चे आवर्तन बंद - आमदार सुरेश गोरे

‘चासकमान’चे आवर्तन बंद - आमदार सुरेश गोरे

चास - ‘‘चास - कमान धरणातून कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर काटकसरीने करून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा,’’ असे आवाहन आमदार सुरेश गोरे यांनी नागरिकांना केले आहे. चास कमानचे आवर्तन शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी बंद करण्यात आले आहे.   

खेड तालुक्‍यातील तिन्ही धरणे पावसाळ्यात शंभर टक्के भरलेली आहे. तालुक्‍याच्या बहुतांशी भागात दुष्काळी सदृश परिस्थिती आहे. खरीप हंगामातील पिके बहुतांशी पावसाअभावी सुकली आहे. उर्वरित भागात उत्पन्न घटण्याची स्थिती आहे. खरिपाची पिके हातची गेल्याने रब्बी हंगामाची स्थितीही काही चांगली होईल, अशी शक्‍यता धूसर आहे. बहुतांशी ओढे नाले कोरडे पडले आहेत. रब्बी हंगामातील पिकांना या ओढ्यांच्या पाण्याचा आधार राहिलेला नाही. पावसाची शक्‍यता धूसर असून, खरिपापाठोपाठ रब्बीही जाण्याची शक्‍यता असल्याने नागरिकांचे सर्वच लक्ष आता केवळ चास-कमान धरणाच्या पाण्याकडे लागले आहे. खेड तालुक्‍यासह शिरूर तालुक्‍याला वरदान ठरलेल्या चास कमान धरणात ८५.२६ टक्के ( ७. ४१ टीएमसी ) पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचे नियोजन नुकतेच कालवा नियोजन समितीच्या बैठकीत झाले आहे. 

चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज आहे. उन्हाळी हंगामात धरणातील पाणी हे फक्त पिण्यासाठी प्राधान्यक्रमाणे वापरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांची योग्य प्रकारे पिकांचे नियोजन करा, पाणी जपून वापरा व पाण्याचा अपव्यय टाळा, असा बहुमोल सल्ला आमदार सुरेश गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांना दिला आहे.

कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबरपासून ३ जानेवारीपर्यंत असे सुमारे पन्नास दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे. दुसरे आवर्तन ४ जानेवारीपासून १८ फेब्रुवारीपर्यंत असे सुमारे ४५ दिवसांचे सलग दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. आवर्तनानंतर केवळ दोन टीएमसी पाणी (कळमोडी धरणातील साठा धरून) धरणात शिल्लक राहणार आहे.
- उत्तम राऊत, प्रभारी उपअभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com