चासकमान धरण १०० टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

चास - खेड तालुक्‍यासह शिरूर तालुक्‍याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. धरण भरल्याने शेतकरी व दोन्ही तालुक्‍यांतील नागरिक आनंदित आहेत. कालवा नियोजन समितीची बैठक घेऊन धरणातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची व वर्षभराच्या आवर्तनाच्या तारखा जाहीर करण्याची मागणी लाभार्थी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथून उगम पावणाऱ्या भीमा नदीवर ८.५३ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण म्हणजे खऱ्या अर्थाने दोन्ही तालुक्‍यांसाठी वरदान आहे. चासकमान धरण झाल्यापासून आजतागायत फक्त २०१५ मध्ये धरण शंभर टक्के भरले नव्हते. नाहीतर दरवर्षी धरण शंभर टक्के भरलेले आहे. मात्र पाणीसाठा मुबलक असूनही दरवर्षी पाणी नियोजनाअभावी अमर्यादपणे पाणी आवर्तनात सोडल्याने मे महिन्याच्या अखेरीस धरणाचा पाणीसाठा उणे स्थितीत पोचतो. चालू वर्षी पावसाने वेळेवर व दमदारपणे हजेरी लावल्याने मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी जुलै महिन्यातच धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. मागील वर्षी १४ ऑगस्ट २०१७ रोजी रात्री दहाच्या सुमारास धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झाला होता. मात्र चालू वर्षी सात जुलै रोजीच म्हणजेच सात दिवस आधीच धरण शंभर टक्के भरल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली. 

दरम्यान, शिरूर तालुक्‍याची पाण्याची गरज पाहता कालव्याद्वारे ५७५ क्‍युसेक, तर नदीपात्रात २७५ क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण शंभर टक्के भरल्याने यापुढच्या काळात कालवा नियोजन समितीची बैठक घेऊन कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करून त्याच तारखांना पाणी सोडून ठरलेल्या तारखेस पाणी बंद केल्यास उन्हाळ्यातील पिके घेणेही शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे.

Web Title: Chaskaman Water Dam 100 Percentage Full