शाहूकालीन समाजजीवन, पानिपतविषयी भाष्य करणारी पत्रे उजेडात

Pune
Pune

पुणे : छत्रपती शाहूकालीन समाजजीवन, त्यावरील भाष्य, तत्कालीन महसूल व्यवस्था आणि पानिपतविषयी भाष्य करणारी अप्रकाशित पत्रे संशोधनातून प्रकाशझोतात आली आहेत. विशेषत्वाने या पत्रांतून बाळाजी विश्‍वनाथ ऊर्फ नानासाहेब पेशवे, महादजी सालोंखे, मराठे विरुद्ध अब्दाली युद्धाचे वर्णन विशद होते, तर जयाजी शिंदे यांनी पानिपतच्या युद्धापूर्वी लिहिलेल्या पत्रातून अब्दालीच्या सैन्याच्या हालचालींवर प्रकाश टाकला आहे. 

इतिहाससंवर्धन, संशोधन व वारसा जतन करण्याच्या उद्देशाने वसंत चॅरिटेबल फाउंडेशन कार्यरत असून, या संस्थेतर्फे इतिहास अभ्यासक घनश्‍याम ढाणे यांनी ही अप्रकाशित पत्रे शोधून काढली आहेत. फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर, विक्रांत इंदूलकर आणि ढाणे यांनी पत्रकार परिषदेत चारही पत्रांविषयी माहिती दिली. संस्थेतर्फे ढाणे यांनी शिवोत्तरकालीन कागदपत्रे संशोधन करण्याचे कार्य सुरू केले आहे. 

पत्रांबद्दल ढाणे म्हणाले, ""छत्रपती शाहू महाराजांचा कार्यकाळ व पानिपतविषयी भाष्य करणारी ही पत्रे आहेत. त्यापैकी दोन पत्रे महादजी सालोंखे यांच्याविषयीची आहेत. त्यात इनाम जमिनीचा उल्लेख आढळतो. त्यास "महजर' (लोकप्रशासनाचा अहवाल) असे म्हटले असून, त्यावर नानासाहेबांची व श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधींची मुद्रा आहे. या महजराची लांबी नऊ फूट सहा इंच व रुंदी नऊ इंच आहे. त्या दस्तावेजावर शिवराज्याभिषेक शके याप्रमाणे तारीख नोंदवलेली आहे. इसवी सनामध्ये रूपांतर केल्यास हा महजर 11 डिसेंबर 1744 रोजीचा असल्याचे स्पष्ट होते.'' 

"दुसरे सालोंखे यांना मिळालेल्या जमिनीचे इनामपत्र आहे. बक्षिसाच्या रूपात मिळालेल्या जमिनीबाबत ते महाराजांशी एकनिष्ठ राहून कार्य करत राहतील,'' असा उल्लेख त्यात असल्याचे ढाणे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""तिसऱ्या पत्रात मराठे विरुद्ध अब्दाली या पानिपतच्या लढाईचा उल्लेख आहे. तसेच, 1777 मध्ये खंडेराव निंबाळकर यांच्या चार मुलांना मौजे कोरेगाव बक्षीस म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. चौथे पत्र पानिपत युद्धापूर्वी लिहिले आहे. त्यात मराठे आणि अब्दाली सैन्याच्या हालचालींबाबतचे वर्णन आहे.'' 

वंशजांकडून मिळाले दस्तावेज 
ही दस्तावेज आम्हाला सालोंखे यांचे वंशज विजयसिंह साळुंखे (इनामदार), तर नाईक निंबाळकरांचे वंशज राजेंद्रसिंह आणि हेमंतराव यांच्याकडे मिळाले आहेत. या पत्रांची फेरतपासणी इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे, शिवराम कार्लेकर यांनी केली असून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभेत त्यांचे वाचन करणार आहोत, असेही ढाणे यांनी सांगितले. 

तत्कालीन वादविवाद सोडविणे, नव्या सत्तेनुसार प्रशासन व्यवस्थेत बदल करणे. यासाठी पाटील, देशमुख, देशपांडे यांच्या साक्षीने लोकप्रकाशनाचा अहवाल अर्थात महजर तयार केला जात असे. 
- घनश्‍याम ढाणे, इतिहास अभ्यासक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com