छत्रपती कारखान्यात सहमती

छत्रपती कारखान्यात सहमती

भवानीनगर - छत्रपती साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे रिऑडिट करणे, २० रुपयांऐवजी १० रुपये भागविकास निधीकपात करणे व शेअरपोटी कपात केलेल्या रकमेच्या न्यायालयीन वादात तडजोड करण्यास सत्ताधारी व विरोधकांत झालेली सहमती, हे आजच्या कारखान्याच्या वार्षिक सभेचे वैशिष्ट्य ठरले.

जिल्ह्यातील माळेगाव, घोडगंगा कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती कारखान्याची वार्षिक सभा सभेच्या ‘साठी’च्या परंपरेला शोभेशी अशीच झाली. कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी सभेची संयम ठेवून उत्कृष्ट केलेली हाताळणी आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या कारभारातील चुकांविषयी कानउघाडणी करताना दिलेला वडीलकीचा सल्ला, हे या कारखान्याच्या वार्षिक सभेचा पोक्तपणा वाढविणारा ठरला. 

कारखान्याची वार्षिक सभा अमरसिंह घोलप यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. आमदार दत्तात्रेय भरणे, कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतराव चोपडे, प्रशांत काटे, कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह आजी-माजी संचालक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीलाच अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. येणाऱ्या हंगामासाठी कारखान्याची ऊस उत्पादकांसाठीची निव्वळ एफआरपी २४९८ रुपये राहणार असून, मागील हंगामाच्या काळात नवे प्रकल्प व एकूणच कर्जाचा विचार करता येणाऱ्या काळात कर्जाचा भार जसा कमी होईल, तसा उसाच्या दरात फायदा होईल, असे ते म्हणाले. सध्या तरी ऊसदराचा विषय सभासदांनी संयमाने घ्यावा, कारखान्यास सहकार्य करावे व ऊस इतरत्र देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. 

घोलप यांच्या भाषणानंतर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तानाजी थोरात यांनी बोलताना अजित पवार यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर सभेत मोठा गदारोळ उमटला. संचालक मंडळानेही तीव्र नाराजी व्यक्त करीत थोरात यांचे भाषण थांबविले. तेवढा अपवाद वगळता सभा शांततेत झाली. सतीश काटे यांनी विविध मुद्द्यांवरून संचालक मंडळाला घेरले. या सभेत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी चुना, गंधकाच्या खरेदीबाबत संचालक मंडळास धारेवर धरले. मुरलीधर निंबाळकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, ॲड. संभाजी काटे, रामचंद्र निंबाळकर, शंकरराव रूपनवर, देवेंद्र बनकर, शिवाजी निंबाळकर, बाळासाहेब कोळेकर, विशाल निंबाळकर यांच्यासह इतरही सभासदांनी या चर्चेत भाग घेतला.

अधिकाऱ्यांना धरले धारेवर
पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या कारभारावर ताशेरे ओढताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांचा कारभार सभासदांपुढे उघडा केला. मागील हंगामातील उशिरा दिलेल्या एफआरपीचे व्याज ९२ लाख रुपये सभासदांना देण्याबाबत अध्यक्ष घोलप यांच्याकडून सभेत होकार घेतला. कारखान्यातील अवास्तव खरेदी, नव्या कारखान्याच्या कामात झालेल्या चुका उघड करताना वाढलेल्या स्टोअरच्या खर्चावरून जाचक यांनी तब्बल दीड तास अधिकाऱ्यांना धारेवर धरत निरुत्तर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com