
बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालणारी व आबालवृध्दांना चार क्षण निवांतपणे व्यतित करण्यासाठी उपयुक्त असणारी चौपाटी लवकरच साकारणार आहे.
बारामतीत तीन ठिकाणी साकारणार चौपाटी
बारामती - शहराच्या (Baramati City) सौंदर्यात भर घालणारी व आबालवृध्दांना चार क्षण निवांतपणे व्यतित करण्यासाठी उपयुक्त असणारी चौपाटी (Chaupati) लवकरच साकारणार आहे. बारामती शहरात तीन ठिकाणी चौपाटी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतला असल्याची माहिती बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.
बारामती शहरातील सध्याच्या साठवण तलावात एक कारंजे तयार करण्यात आले आहे, त्याला जोडून आणखी कारंजी ओळीने साकारणार असून त्याला लागूनच असलेल्या जागेमध्ये चौपाटी केली जाणार आहे.
या बाबतचे सादरीकरण उपमुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या दौ-यात त्यांना केले गेले. या बाबतच्या प्लॅनला त्यांनी मंजूरी दिली असून साठवण तलाव, गरुड बाग ते स्विमींग टॅकमधील नीरा डावा कालव्यालगतची जागा व नीरा डावा कालव्यालगत असलेल्या जागेत चौपाटी विकसीत करण्याचे प्राथमिक नियोजन असल्याचे सचिन सातव म्हणाले.
नागरिकांसाठी ओपन जिम, खाद्यविक्रीचे स्टॉल्स, बसण्यासाठी बाके व मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी अशी या चौपाटीची रचना असेल. बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही ठिकाणे ठरतील. या ठिकाणी विद्युत व्यवस्थाही केली जाणार असून संध्याकाळीही लोक या ठिकाणी चार क्षण विसावा घेऊ शकतील व मुले खेळू शकतील.
अतिशय दर्जेदार व परदेशातील काही प्रतिकृतींनुसार याचे डिझाईन व्हायला हवे अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या असून याच्या निविदा होऊन त्या नंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. बारामतीकरांकडे येणा-या पाहुण्यांनाही येथे चार क्षण निवांतपणे व्यतित करता येतील अशी त्याची रचना केली जाणार आहे.
Web Title: Chaupati To Be Constructed At Three Places In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..