चेकबुकची मागणी तिप्पट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पुणे - नोटाबंदीनंतर डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर आणि ऑनलाइन बॅंकिंगला प्राधान्य देणे नागरिकांच्या अंगवळणी पडू लागले आहे. त्यामुळे धनादेश (चेक) पुस्तिकेच्या मागणीत तिप्पट वाढ झाली असून, बॅंकांच्या ‘क्‍लीअरिंग हाउस’च्या कामकाजात वाढ झाली आहे. बॅंकांकडे चेकबुकच्या छपाईची क्षमता मर्यादित असल्याने चेकबुकसाठी पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. नोटाबंदीपूर्वी चेकबुक सात ते आठ दिवसांत मिळत होते. 

बॅंकांचे ९५ टक्के व्यवहार ‘सीटीएस’ (चेक ट्रंकेशन सिस्टिम) प्रकारच्या धनादेशांद्वारे होतात. ही प्रणाली ‘चेक’ त्वरित ‘पास’ होण्यासाठी ऑगस्ट २०१३ पासून अमलात आणली जात आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) या संस्थेने दिलेल्या निर्देशानुसार चेकबुक (सीटीएस) या प्रणालीतच छापावे लागते. त्यामुळे खातेदाराची सर्व माहिती एका क्‍लिकवर समजते. दरम्यान, सध्या व्यापारीवर्गाकडून पाचहून अधिक चेकबुकची, बचत खातेदारांकडून दोन ते तीन चेकबुकची मागणी होत आहे; मात्र बॅंकांचे ज्या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय असेल, तेथून ही चेकबुक प्रिंट होऊन खातेदारांना टपालाद्वारे पाठविण्यात येतात. उदा. ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’च्या देशभरात १८९६ शाखा असून, ८ नोव्हेंबरपूर्वी दिवसाला पाच हजार अशी महिन्याला १,२५,००० चेकबुक छापून दिली जात होती. सध्या दिवसाला पंधरा हजार अशी महिन्याला ३,७५,००० चेकबुकची छपाई करावी लागत आहे. 

बहुतांश राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांकडील चेकबुकची मागणी याच पटीत वाढल्याचे दिसून येत आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे विभागाचे सहायक सरव्यवस्थापक निरंजन पुरोहित म्हणाले, ‘‘केंद्राचे कॅशलेस इकॉनॉमीचे धोरण आहे. नागरिकांनीही अधिकाधिक प्रमाणात धनादेशाद्वारे आणि ऑनलाइन बॅंकिंगद्वारे व्यवहार केले, तर रोकडची कमतरता भासणार नाही. रोकड जवळ बाळगण्याचा धोकाही टळेल आणि व्यवहार करणेही सोईस्कर होईल.’’ 

पूर्वीपेक्षा बॅंकेकडे तीस-चाळीस टक्‍क्‍यांनी चेकबुकची मागणी वाढली आहे. त्यामुळे खातेदारांना वेळेत चेकबुक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
- ब्रिजमोहन शर्मा, मुख्य सरव्यवस्थापक, पुणे विभाग, आयडीबीआय बॅंक

बॅंकेच्या खातेदारांपैकी चेकबुक मागणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. पूर्वी पाच दिवसांत चेकबुक देत होतो. आता मात्र खातेदारांना पंधरा दिवसांत ते मिळते.
- डी. आर. कदम, शाखा व्यवस्थापक, रविवार पेठ, यूको बॅंक

Web Title: cheaq book demand increase