चार कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

पुणे - वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली विश्रामबाग पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात अटक आरोपीशिवाय एक बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीचा समावेश आहे.

पुणे - वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली विश्रामबाग पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात अटक आरोपीशिवाय एक बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीचा समावेश आहे.

याप्रकरणी वसंत पुरुषोत्तम सातपुते (वय 90, रा. तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन सदाशिव चव्हाण (वय 31, रा. स्वानंद सोसायटी, वडगाव), हिमांशू श्रीहरी जळूकर (वय 43, रा. योगेश अपार्टमेंट, सहकारनगर) यांना अटक केली. त्यांची न्यायालयाने 24 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्यात शांती चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक अजय गोविंद भुते, त्यांची पत्नी प्राची अजय भुते (दोघे रा. सहकारनगर), सरिना नामदेव पाटील (रा. कुमार हाउस, एनआयबीएम रोड), वामनराव निवृत्ती पारधे (रा. विश्रांतवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

आरोपी भुते अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या खेड शिवापूरजवळील गाऊडदरा येथील "शांती निकेतन' या वृद्धाश्रमात फिर्यादी सातपुते यांच्यासह आणि इतर ज्येष्ठ नागरिकांनी आजीवन राहण्यासाठी करार केले होते. त्यासाठी यापैकी प्रत्येकाने भुते यांच्या सदाशिव पेठेतील कार्यालयात सुमारे 21 लाख ते 25 लाख रुपये भरले होते. या करारानुसार ज्येष्ठ नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत, त्यामुळे फसवणूक झाल्याचे उघड झाले. सातपुते यांनी राजगड पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दिली होती. हा गुन्हा त्यांच्याकडून विश्रामबाग पोलिस ठाण्यात वर्ग केला गेला.

पोलिसांनी आरोपी चव्हाण, जळूकर यांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी करताना आरोपी भुते पती-पत्नीला फेब्रुवारी महिन्यात एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहितीही न्यायालयास दिली. आरोपीने पुरंदर येथे गृह प्रकल्प जाहीर करून नागरिकांची फसवणूक केली होती.

Web Title: cheater arrested by police

टॅग्स