फसवणूक प्रकरणी शाळा पदाधिकाऱ्यांविरुध्द पोलिसांकडे तक्रार

दत्ता म्हसकर
सोमवार, 30 एप्रिल 2018

शाळेच्या अंदाजपत्रकात घसारा म्हणून २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षात विविध रकमा दाखविल्या असताना या रक्कमा पालकांकडून वसूल करणे म्हणजे चक्क नफेखोरी सिध्द होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

जुन्नर : आर. टी. ई. नुसार 25% राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या बालकांच्या पालकांकडून फी वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाचे पदाधिकाऱ्याविरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली.

मोफत प्रवेश कोट्यातून शाळेने प्रवेश दिलेल्या बालकांच्या पालकांकडून वर्षाची संपूर्ण फी वसूल केली असल्याचे लाभार्थी पालकांच्या पडताळणीत त्यांनी दिलेल्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे. असे प्रवेश मिळालेल्या मुलांकडून फी घेता येत नसताना या मुलांच्या पालकाकडून शाळेने सन २०१४-१५ ते २०१६-१७ या ३ वर्षात शाळेची फी वसूल करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. २०१४-१५ अखेर पर्यंतचा फी परतावा शाळांना दिला असताना शाळा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन यांनी संगनमताने ही बाब पालकांना कळविली नाही.  

शाळेने वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षात ५६ प्रवेश दिले आहेत.या प्रवेश दिलेल्या मुलांकडून फी वसूल करून शाळा व संस्थेने पालक आणि शासनाची फसवणूक केली आहे. ही शाळा २००१ पासून सुरु असून संस्थेने डिसेंबर २०१७ पर्यंत एकाही कर्मचाऱ्याचा EPF तसेच व्यवसाय कर, आयकर भरला नाही. ज्या शिक्षकांना नियुक्ती आदेशच दिलेले नाहीत अशा शिक्षकांना एकमुठी वेतन दिले आहे. शिक्षकांचे सेवापुस्तक ठेवले नाही अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची गळचेपी केली आहे.

शाळेच्या अंदाजपत्रकात घसारा म्हणून २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षात विविध रकमा दाखविल्या असताना या रक्कमा पालकांकडून वसूल करणे म्हणजे चक्क नफेखोरी सिध्द होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक असतांना त्यांच्याकडून फी वसूल करणे आणि शासन व पालक यांची फसवणूक करणे, नफेखोरी करणे , शासनाचा व्यवसाय कर चुकविणे, नियुक्ती आदेशच न दिलेल्या शिक्षकांना मुलांच्या फी मधून पगार देणे, मोठ्या प्रमाणात फी वसूल करून शिक्षकांना कमी पगारावर ठेऊन वेठबिगारी स्थिती आणणे, या व इतर गंभीर कारणामुळे सदर शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री शैलेंद्र काजळे ,संस्थेचे कार्याध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष नितीन कांतीलाल मेहता , संस्थेचे सचिव तथा शाळा समिती सदस्य सुधीर मनोहर ढोबळे, सदस्य धनेश चुनीलाल संचेती , सदस्य अविनाश विठ्ठलराव थोरवे, सदस्य नेहा भरत सदाकाळ यांचेविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवून त्यांचेवर पुढील कायदेशीर कारवाई करावी असे नमूद केले आहे.

Web Title: cheating case in junnar