गुंगी आली पण ऐवज वाचला...

ST
ST

मंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने अर्ध्यावरच एसटी गाडीतून उतरून पलायन केले. त्यामुळे ८० हजार रुपये रोख रक्कम, गळ्यातील सोन्याची साखळी, सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण दीड लाख रुपये ऐवजाची होणारी लूट टळली. 

पुणे-शिवाजीनगर बसस्थानकावरून कळंबला जाण्यासाठी मंगळवारी (ता. ४) संध्याकाळी चार वाजता पुणे ते पोखरी एसटीमध्ये डुकरे बसले. त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने पाहून त्यांच्यावर चोरट्यांनी पाळत ठेवली होती. त्यांच्या शेजारीच चोरटा बसला. संचेती हॉस्पिटलजवळ एसटी आल्यानंतर सदर व्यक्तीने गप्पा मारून आग्रह केल्यामुळे दिलेली दोन बिस्किटे डुकरे यांनी खाल्ली. बिस्किटे कडवट असल्याचे डुकरे यांनी सांगितले. त्यानंतर सदर व्यक्तीने चॉकलेट व प्यायला पाणीही दिले. ‘तुमची मुले काय करतात,’ असे विचारल्यानंतर डुकरे यांनी ‘माझा मुलगा पुण्यात पोलिस खात्यात आहे,’ असे सांगून त्याला मुलाचे ओळखपत्र दाखविले. त्यानंतर त्या व्यक्तीचे हावभाव बदलले. एसटी मागे असलेल्या कारचा चालक सारखा हॉर्न वाजवत होता. सदर व्यक्ती त्यांना काहीतरी खुणावत होता. सदर प्रवाशाने नारायणगावपर्यंतचे तिकीट काढले होते. एसटी नाशिक फाटा येथे आल्यानंतर ‘माझी गाडी मागे आली आहे, माझी सोय झाली आहे,’ असे सांगून वाहकाकडे तिकीट देऊन नाशिकफाट्यावर तो खाली उतरला.  
डुकरे हे जाग्यावरच झोपून गेले. कळंब थांबा आला तरी ते उतरले नाही.

त्यामुळे कळंब गावापुढे असलेल्या तिरंगा ढाब्यासमोर एसटी थांबवून डुकरे यांना उतरविण्यात आले. तेथे उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, संतोष भालेराव, उद्योजक नितीन भालेराव यांनी डुकरे यांची अवस्था पाहिली. ते गुंगीतच होते. काहीच बोलत नव्हते. ताबडतोब त्यांना मंचर येथील गुजराथी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. बुधवारी (ता. ५) रात्री उशिरा डुकरे शुद्धीवर आले. घडलेला सर्व प्रकार त्यांनी कुटुंबीयांना सांगितला. पुणे शहर येथील गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असणारा त्यांचा मुलगा समीर डुकरे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत मंचर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com