बोहल्यावर चढण्याआधीच पोलिसांच्या हातकड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

वऱ्हाडी मंडळी न्यायालयात
जामिनावर सुनावणी होणार असल्याने अमितकडील वऱ्हाडी मंडळी न्यायालयात सकाळी अकरालाच दाखल झाली होती. सुमारे दोन बस भरून वऱ्हाडी मंडळी आली होती. अखेर अमितला जामीन मिळाला. त्यामुळे आनंदी झालेले वऱ्हाडी अमितला घेऊन लग्नाला निघाले. मात्र थोड्याच वेळात त्याच्या लग्नाचे स्वप्न भंगले.

पुणे - पोलिस असल्याचे भासवत लाच मागणाऱ्या नवरदेवाला लग्नाच्या आदल्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही बाब वधू पक्षाकडील मंडळींना समजल्याने त्यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे तोतया पोलिसाच्या लग्नाचा डाव अर्ध्यावरच मोडला व दोन्ही पक्षांनी केलेली लग्नाची तयारीदेखील वाया गेली. 

चित्रपटातील कथा शोभावी, असा प्रसंग अमित रमेश मोहिते (रा. चिखली) याच्या बाबतीत घडला. अमितसह अर्जून अच्छेलाल विश्‍वकर्मा (रा. वाकड) याला १ लाख ६ हजारांची लाच घेताना अटक केली. गुन्हे शाखेने मोहननगर येथे तक्रार दाखल केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पैसे देण्याचा बनाव करून व पोलिस असल्याचे सांगत त्यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली होती. 

अमितचे सातारा जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न ठरले होते. गुरुवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सातारा येथे त्याचा विवाह होता. त्यामुळे जामीन मिळाला नसता तर लग्न पुढे ढकलावे लागले असते. मात्र त्याचे वकील ॲड. प्रताप परदेशी यांनी अमितचे लग्न असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. जामीन देण्याची मागणी मान्य करीत, विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सोडले. जामीन मिळाल्यानंतर वऱ्हाड लग्नाच्या ठिकाणी जायला निघाले. मात्र त्यांना लग्न मोडल्याचे समजले.

Web Title: Cheating Crime Marriage Police