सॉफ्टवेअर विक्रीतून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुण्यासह बारामती, जुन्नर बाजार समितीत विक्री
कुंजीर यांच्या सॉफ्टवेअरचा सोर्सकोड व व्यावसायिक स्थित्यंतरांची माहिती, बदल यांची त्याने चोरी केली. त्यामुळे कुंजीर यांची व्यावसायिक अडवणूक व आर्थिक फसवणूक झाली. कुंजीर यांचे सॉफ्टवेअर स्वतःचेच आहे, असे भासवून जेवरे याने पुणे, बारामती, जुन्नर येथील बाजार समित्यांमधील अडते व व्यापाऱ्यांसोबतच सुजाता कोल्ड्रींक्‍स, डिलक्‍स ड्रायक्‍लीनर्स, हॉटेल शुभम, वेदांत प्युअर व्हेज, शिवराज कोल्ड स्टोरेज, चंद्रमा रेस्टॉरंट आदींना त्याची विक्री केली.

पुणे - शेतीमाल अडत व्यवसाय आणि खरेदी-विक्रीसाठी तयार केलेल्या वैयक्तिक सॉफ्टवेअरचा सोर्सकोर्ड, व्यावसायिक माहिती आणि पासवर्डची चोरी करून सॉफ्टवेअर व्यावसायिकाने शहर व परिसरातील तीनशेहून अधिक व्यावसायिकांना त्याची विक्री करून फसवणूक केली आहे.

याप्रकरणी मार्केट यार्डातील अडते किशोर कुंजीर (वय ४९, एनआयबीएम) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश जेवरे (वय ४२, कुदळे पाटील टाऊनशिप, माणिकबाग, सिंहगड रोड) याला २९ मार्चला अटक झाली असून, त्याची रवानगी काल (ता. ६) येरवडा कारागृहात झाली. कुंजीर यांचे मार्केट यार्डात पाच गाळे आहेत. व्यवसायासाठी कुंजीर यांना सॉफ्टवेअरची गरज होती.

त्यांनी स्वतःच्या व्यावसायिक गरजांनुसार डिझाइन करून सॉफ्टवेअर १९९५ मध्ये तयार करून घेतले. या सॉफ्टवेअरच्या अपग्रेडेशनसाठी २००७ मध्ये जेवरे याने इच्छा दाखविली. त्यासाठी कुंजीर आणि जेवरे यांनी करार केला. परंतु, एप्रिल २०१६ पर्यंत जेवरेने ही जबाबदारी पूर्ण केली नाही.

याबाबत कुंजीर यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास मार्केट यार्ड पोलिसांकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी जेवरेच्या अप्पा बळवंत चौकातील कार्यालयाची झडती घेतली. तेव्हा त्यात त्याने सॉफ्टवेअर विकलेल्या तीनशे जणांची नावे सापडली.

पुण्यासह बारामती, जुन्नर बाजार समितीत विक्री
कुंजीर यांच्या सॉफ्टवेअरचा सोर्सकोड व व्यावसायिक स्थित्यंतरांची माहिती, बदल यांची त्याने चोरी केली. त्यामुळे कुंजीर यांची व्यावसायिक अडवणूक व आर्थिक फसवणूक झाली. कुंजीर यांचे सॉफ्टवेअर स्वतःचेच आहे, असे भासवून जेवरे याने पुणे, बारामती, जुन्नर येथील बाजार समित्यांमधील अडते व व्यापाऱ्यांसोबतच सुजाता कोल्ड्रींक्‍स, डिलक्‍स ड्रायक्‍लीनर्स, हॉटेल शुभम, वेदांत प्युअर व्हेज, शिवराज कोल्ड स्टोरेज, चंद्रमा रेस्टॉरंट आदींना त्याची विक्री केली.

किशोर कुंजीर यांनी तयार केलेली संगणक प्रणाली योगेश जेवरे याने किमान ३०० जणांना विकल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबत तपास सुरू आहे. 
- संभाजीराव निंबाळकर, पोलिस निरीक्षक, मार्केट यार्ड

Web Title: Cheating Software Sailing Crime