रासायनिक पदार्थांसाठी क्‍लस्टर उभारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - ऑटो क्‍लस्टरच्या धर्तीवर रासायनिक पदार्थांसाठीही स्वतंत्र क्‍लस्टर उभारण्यास सरकारने पुण्यात जागा द्यावी, अशी मागणी पुणे केमिकल डीलर्स असोसिएशनने केली आहे. तसेच शहरात रासायनिक झोन निर्माण करून कायद्यातही सुसूत्रता आणावी, अशी मागणीही या संघटनेने केली.

पुणे - ऑटो क्‍लस्टरच्या धर्तीवर रासायनिक पदार्थांसाठीही स्वतंत्र क्‍लस्टर उभारण्यास सरकारने पुण्यात जागा द्यावी, अशी मागणी पुणे केमिकल डीलर्स असोसिएशनने केली आहे. तसेच शहरात रासायनिक झोन निर्माण करून कायद्यातही सुसूत्रता आणावी, अशी मागणीही या संघटनेने केली.

‘सकाळ’ने पुणे केमिकल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमंत्रित केली होती. संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र रहेजा, उपाध्यक्ष कुमार भोगशेट्टी, सचिव शशिकांत पदमवार, खजिनदार सुजित भटेवरा, सदस्य नरेंद्र लोढा, सुमीत दोशी, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया आदी उपस्थित होते.  युरोप, अमेरिकेचे रसायनाबाबतचे कायदे कडक असून, भारतातील वातावरणही आता बदलू लागले आहे. निर्णयप्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे आता क्षेत्रात बदल होत आहेत. ॲसिटीक अनहाईड्राइट, अमोनिअम नायट्रेट यांसारख्या मादक रसायनांच्या विक्रीवर बंदी असल्यामुळे शिक्षण क्षेत्राला त्यांचा पुरवठा करण्यात आम्हाला अडचणी येतात. तसेच त्या रसायनांचा दुरुपयोग झाला तर त्याचा त्रास भोगावा लागतो, अशी खंतही या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. 

खाद्यपदार्थामध्ये होणारी भेसळ ओळखण्याकरिता ग्राहकांना स्वस्तामध्ये किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्याबरोबरच रसायनांचे प्रदर्शन भरवून त्यांची माहिती देण्याचीही योजना आहे. या क्षेत्रासाठी स्वतंत्र क्‍लस्टर उभारल्यास रसायनांची साठवण एकाच ठिकाणी करून त्यांच्या सुरक्षेचीही तजवीज करता येईल, अशी सूचना या पदाधिकाऱ्यांनी केली.

आमच्या संघटनेची सुरवात ८ जून १९९५ रोजी झाली. या व्यवसायातील काही ज्येष्ठ मंडळींनी व्यवसायातील समस्यांवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. रसायनांचा वापर अनेकविध क्षेत्रांमध्ये होतो. विशेषतः रुग्णालये, औषधनिर्माण; तसेच कापडनिर्मिती या क्षेत्रांत रसायनांची मोठी गरज असते. पुण्यातील रासायनिक उद्योगाची उलाढाल साधारणतः पाचशे ते सातशे कोटी आहे.
- सतीशचंद्र रहेजा, अध्यक्ष, पुणे केमिकल डीलर्स असोसिएशन

Web Title: chemical goods auto cluster