कूपनलिकेत रसायनयुक्त पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पिंपरी - चिखली-मोशीदरम्यानचा इंद्रायणी नदी परिसर... अनेक भंगाराची गोदामे... रात्री दहानंतरची वेळ... काही भागांत छोट्या रस्त्यांवरून टॅंकर नदी पात्राकडे जातात... भंगार गोदामाचे भले मोठे लोखंडी गेट उघडले जाते... टॅंकर आत आल्यानंतर गेट बंद केले जाते... टॅंकरचा पाइप कूपनलिकेच्या खड्ड्यात सोडला जातो... कॉक सुरू करून टॅंकरमधील द्रवपदार्थ कूपनलिकेत सोडले जाते... ते असते रसायनयुक्त पाणी... घातक... अतिघातक... त्यामुळे आमच्या सोसायट्यांमधील बोअरवेलचे पाणीही प्रदूषित होत आहे... त्यावर तेलकट तवंग असतो... भूगर्भातील पाणीच अशा पद्धतीने प्रदूषित केले जात आहे...

पिंपरी - चिखली-मोशीदरम्यानचा इंद्रायणी नदी परिसर... अनेक भंगाराची गोदामे... रात्री दहानंतरची वेळ... काही भागांत छोट्या रस्त्यांवरून टॅंकर नदी पात्राकडे जातात... भंगार गोदामाचे भले मोठे लोखंडी गेट उघडले जाते... टॅंकर आत आल्यानंतर गेट बंद केले जाते... टॅंकरचा पाइप कूपनलिकेच्या खड्ड्यात सोडला जातो... कॉक सुरू करून टॅंकरमधील द्रवपदार्थ कूपनलिकेत सोडले जाते... ते असते रसायनयुक्त पाणी... घातक... अतिघातक... त्यामुळे आमच्या सोसायट्यांमधील बोअरवेलचे पाणीही प्रदूषित होत आहे... त्यावर तेलकट तवंग असतो... भूगर्भातील पाणीच अशा पद्धतीने प्रदूषित केले जात आहे... ही वस्तुस्थिती परिसरातील रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.

शहर परिसरात इंद्रायणी नदीचे क्षेत्र देहूपासून निरगुडीपर्यंत आहे. या पट्ट्यात तळवडेगाव, आयटी पार्क, चिखली, कुदळवाडी, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, चऱ्होली, म्हाळुंगे, मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, धानोरे आदी गावांचा समावेश होतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात कारखानदारी असून चिखली, मोशी परिसरात भंगाराची दुकाने व गोदामे आहेत. येथील घातक रासायनिक पाणी नाल्यांद्वारे थेट नदी पात्रात सोडले जाते, हे वास्तव अनेक वर्षांपासून असताना आता काहींनी गोदामांमध्ये  कूपनलिका घेऊन त्यात रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

रस्त्यांवर घातक कचरा
तळवडे, म्हाळुंगे, चिखली, मोई, मोशी, चिंबळी परिसरात इंद्रायणी नदी परिसरात कारखान्यांमधील घातक रासायनिक कचरा टाकला जात आहे. तो पावसाच्या पाण्यामुळे वाहून नदीत मिसळून जलप्रदूषण वाढत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांनाही त्रास होत आहे, असे प्राधिकरण नागरी कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत गेल्या दोन वर्षांपासून पाहणी करीत आहोत. कंपन्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे.’’

यामुळे केली पाहणी
आपल्या कूपनलिकेच्या पाण्यावर तेलकट तवंग येतोय. पाण्याचा रंग बदलला असून दुर्गंधी येत आहे, असे निदर्शनास आल्यानंतर चिखली-मोशी पट्ट्यातील काही नागरिकांनी रात्री पाहणी केली. त्याची ‘आखोदेखी’ ‘सकाळ’कडे मांडली. चिखली-मोशी पट्ट्यात काहींनी कूपनलिका खोदल्या आहेत. त्यात रसायनयुक्त पाणी सोडले जाते. त्याबाबत विचारणा केल्यास दमदाटी केली जाते. त्यामुळे टॅंकरद्वारे पाण्याची सोय करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

औद्योगिक परिसरात उघड्यावर टाकलेला कचरा एमआयडीसीने तातडीने उचलण्याची व्यवस्था करावी. भरारी पथकांची नेमणूक करून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
- विजय मुनोत, पर्यावरणप्रेमी

Web Title: Chemical water in bore hole