तरुणाच्या प्रसंगावधानाने पिता-पुत्रांची भेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

आमच्या साई जनसेवा संस्थेचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या मदतीने आजोबांना घोडेगाव (ता. पुणे) येथे वृद्धाश्रमात ठेवणार होता. पोलिसांशी बोलून सर्व सोपस्कार झाले होते. मात्र, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधक पतवारी व सीता मॅडम, व्यंकटेश, सोमनाथ आबा, सामाजिक कार्यकर्ते ओमकार सावंत यांच्या मदतीने आजोबांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून जीवनाचा खरा आनंद मिळाला.
- विलास मोरे, मोशी-प्राधिकरण

पिंपरी - रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झालेले आजोबा सवयीप्रमाणे स्थानकावर गेले. गाडीत बसले. थेट पुण्यात पोचले. भटकंती करीत मोशीत आले. पोटात अन्न नव्हते. जनावरांसाठी घराबाहेर ठेवलेले अन्न खाऊ लागले. एका तरुणाने त्यांना चांगले अन्न व पाणी दिले. विचारपूस केली. पण, भाषेची अडचण आली. आजोबा तेलगू बोलत होते. तरुणाने व्हॉट्‌सॲप व इंटरनेटचा वापर करून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तेलगू येणाऱ्या साधकांशी संपर्क साधला 
आणि आजोबांची माहिती मिळाली. तेलंगण पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि नऊ महिन्यांपासून बेपत्ता आजोबा भेटले.

चेन्नया देवरा (वय ६५, रा. रामपूरम, जि. वरंगळ, तेलंगण) असे आजोबांचे नाव. रेल्वेत लाइनमन होते. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुखात जगत होते. नातवंडांसोबत रमले होते. पण, वयोमानानुसार भ्रांती पडली. थेट रेल्वेस्थानक गाठले. गाडी पकडली आणि पुण्यात आले. जवळचे थोडेफार पैसे संपले होते. भुकेने जीव व्याकूळ झाला. मिळेल ते शिळपाकं अन्न खात होते. मोशी-प्राधिकरणातील पेठ क्रमांक चारमधील कामगार, सामाजिक कार्यकर्ते व आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक विलास मोरे यांच्या दृष्टीस ते पडले.

रोजच्या प्रमाणे भटकी कुत्री व गाईंसाठी घराबाहेर ठेवलेले अन्न आजोबा खात होते. रात्रीचे आठ-साडेआठ झाले होते. 

विलास यांनी आजोबांना चांगले अन्न, पाणी दिले. विचारपूस केली. ते तेलगूत बोलत होते. काहीच समजत नव्हते. विलास यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मरकळ (ता. खेड, जि. पुणे) येथील आश्रमातील तेलगू जाणणाऱ्या महिला साधक पतवारी यांच्याशी संपर्क साधला. 

मोबाईलद्वारे आजोबांशी बोलायला लावून माहिती घेतली. त्यानुसार रामपूरम गावाचा इंटरनेटद्वारे शोध घेतला. तेलंगणातील मटवारा व नेमनूर पोलिसांशी संपर्क साधला. 

आजोबांचे छायाचित्र व्हॉट्‌सॲपद्वारे पाठविले. मटवाराचे पोलिस उपनिरीक्षक नरसिंहराव यांचा मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास फोन आला. चेन्नया यांची ओळख पटली होती. ते २२ सप्टेंबरपासून बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधला. दोन दिवसांनी मुलगा रवी, मुलगी व नातू मोशीत आले. आजोबांना पाहून सर्वांनीच अश्रूंना वाट करून दिली. मोरे कुटुंबीयांचा पाहुणचार घेऊन सर्वजण परतले.

Web Title: Chennaya Devara Grandfather Son Meet Humanity