चेतन तुपे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नियुक्ती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापालिकेतील गटनेतेपदी चेतन तुपे यांची बुधवारी निवड जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार असल्यामुळे त्या पदावर आता तुपे काम करणार आहेत. 

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापालिकेतील गटनेतेपदी चेतन तुपे यांची बुधवारी निवड जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार असल्यामुळे त्या पदावर आता तुपे काम करणार आहेत. 

महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार आहे. या पदावर काम करण्याची संधी मिळावी, म्हणून पक्षांतर्गत मोठी चुरस होती. 13 नगरसेवकांनी या पदासाठी मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्ष आणि खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी महापालिकेत पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत तुपे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या प्रसंगी महापौर प्रशांत जगताप, पक्षाचे सर्व माजी महापौर, ज्येष्ठ सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

महापौरांची निवड झाल्यावर विरोधी पक्षनेत्याचे पत्र आता तुपे यांना देतील. त्यानंतर तुपे यांचा विरोधी पक्षनेत्याचा कार्यकाळ सुरू होईल. 

या प्रसंगी पक्षाच्या नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी नगरसेवकांना अभ्यास करून सभागृहात बोलावे, असे आवर्जून सांगितले. त्या म्हणाल्या, ""यापुढील काळात पक्षाला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडायची आहे. निवडणुकीदरम्यान आपण जाहीरनाम्याद्वारे पुणेकरांना अनेक आश्‍वासने दिली आहेत. त्यांची पूर्तता करायची आहे, याचे भान सदस्यांनी ठेवावे. नव्या सदस्यांनी ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच अर्थसंकल्पाचा अभ्यास केला पाहिजे. नागरी प्रश्‍नांबाबत ठोस भूमिका घेऊन नागरिकांची कामे मार्गी लागली पाहिजेत.'' 

तुपे यांना अडीच वर्षे संधी ? 
विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इच्छुक मोठ्या संख्येने होते. त्यांची दखल पक्षाला घ्यावी लागली. पाच वर्षांत किमान दोघांना या पदावर काम करण्याची संधी मिळेल, असे शहराध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले; मात्र या पदावर महापौरपदाच्या धर्तीवर सव्वा-सव्वा वर्ष काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी पक्षातून होत आहे. त्याबाबत पक्षाचे नेते अजित पवार मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुरवातीला तुपे हेच विरोधी पक्षनेते असतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: chetan tupe new group leader pmc