आखाड पार्टी जोरात; 400 टन चिकन,18 टन मासळी फस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

आषाढातील शेवटच्या दिवशी मटणाला मोठी मागणी होती. दिवसभरात शहर आणि जिल्ह्यात चार टन मटणाची विक्री झाली.   
- प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, मटण विक्रेता दुकानदार संघटना

मार्केटयार्ड(पुणे) : आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी मासळी, चिकन आणि मटण बाजारात मोठी उलाढाल झाली. शहर आणि जिल्ह्यातील खवय्यांनी सुमारे ४०० टन चिकन, चार टन मटण आणि सुमारे १८ टन मासळी फस्त केली. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने गेल्या दोन दिवसांत मटणाच्या भावात २० रुपयांनी वाढ झाली, तर चिकन व मटणाचे भाव स्थिर राहिले, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण मार्केट, पौड फाटा येथील मासळी बाजार, लष्कर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट येथील बाजारात आज सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच हॉटेल व्यावसायिकांनी येथूनच खरेदी केली.   

पुणे जिल्ह्यातील कुक्कटपालन करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून जिवंत कोंबड्यांची मोठी आवक झाली. साधारणपणे शहर आणि जिल्ह्यात चारशे टन चिकनची विक्री झाल्याची माहिती शीतल अॅग्रोचे रूपेश परदेशी यांनी दिली. गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले, ‘‘पावसाळ्यामुळे पश्‍चिम किनारपट्टीवर मासेमारी बंद आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पूर्व किनारपट्टीवरून आवक सुरू आहे.’’

आखाड पार्टी जोरात
गेल्या काही वर्षांपासून आखाड पार्टी हा इव्हेंट झाला आहे. कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन ही पार्टी साजरी केली जाते. यंदाही अनेक ठिकाणी आज ही आखाड पार्टी जोरात झाली. त्यात ‘चुलीवरील मटणा’ला अनेकांनी पसंती दिली. काहींनी विविध मांसाहारी हॉटेलना पसंती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken Mutton Fish Selling on Aakhad Party