बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या सभेचे दहीहंडी सणावर सावट

मिलिंद संगई
बुधवार, 31 जुलै 2019

- बारामती येथील परंपरागत उत्सव असलेल्या दहीहंडी सणावर मुख्यमंत्र्यांच्या सभेचे सावट आहे.
- बारामतीची दहीहंडी व मुख्यमंत्र्यांची सभा एकाच दिवशी (25 ऑगस्ट) एकाच वेळेस येत असल्याने आता नेमके काय होणार याबाबत उत्सुकता आहे.
- प्रशासनाने दहीहंडीचा दिवस बदलावा असा अप्रत्यक्ष दबाव दहीहंडी मंडळांवर आणण्यास प्रारंभ 
-  दहीहंडी मंडळींनी मात्र, मुख्यमंत्र्यांनी सभेची तारीख बदलावी असा सूर आळवला आहे, त्यामुळे आता यात काय तोडगा निघतो याकडे बारामतीकरांची लक्ष आहे. 

बारामती : बारामती येथील परंपरागत उत्सव असलेल्या दहीहंडी सणावर मुख्यमंत्र्यांच्या सभेचे सावट आहे. बारामतीची दहीहंडी व मुख्यमंत्र्यांची सभा एकाच दिवशी (25 ऑगस्ट) एकाच वेळेस येत असल्याने आता नेमके काय होणार याबाबत उत्सुकता आहे. प्रशासनाने दहीहंडीचा दिवस बदलावा असा अप्रत्यक्ष दबाव दहीहंडी मंडळांवर आणण्यास प्रारंभ केला असून दहीहंडी मंडळींनी मात्र मुख्यमंत्र्यांनी सभेची तारीख बदलावी असा सूर आळवला आहे, त्यामुळे आता यात काय तोडगा निघतो याकडे बारामतीकरांची लक्ष आहे. 

बारामतीमध्ये दहीहंडीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्यासाठी बारामतीचे गोविंदा राज्यात प्रसिद्ध आहेत. गोपाळकाल्याच्या दुसऱ्या दिवशी बारामतीत दहीहंडी साजरी केली जाते. यंदा दहीहंडी व मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा एकाच दिवशी येत असल्याने पोलिस प्रशासनाने दहीहंडी मंडळांवर तारीख बदलावी यासाठी अप्रत्यक्ष दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे . मात्र, थेटपणे पोलिसांनी मंडळांना काहीही सांगितले नाही.

 दुसरीकडे दहीहंडी मंडळांनी मात्र ही वर्षानुवर्षाची बारामतीची परंपरा असल्याने मुख्यमंत्र्यांनी सभेची तारीख बदलावी व या परंपरेचा मान ठेवावा असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची सभा व बारामतीची दहीहंडी यामध्ये नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेचे ठिकाण रेल्वे ग्राउंड आहे व दहीहंडी उत्सव भिगवण चौक ते गांधी चौक इंदापूर चौक या परिसरात होतो, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांची सभा व दहीहंडी एकाच दिवशी झाले तर, पोलिस यंत्रणेवर कमालीचा ताण येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने भाजप एकीकडे शक्तिप्रदर्शन करणार असल्याने बारामतीत त्यादिवशी गर्दी होईल व दुसरीकडे दहीहंडीसाठी होणारी गर्दी असा विचार केला तर सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण येणार हे निश्चित आहे.

 ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने यात आता काहीतरी तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, दहीहंडी मंडळांकडून देखील मुख्यमंत्र्यांनी सभेची तारीख बदलावी असा प्रयत्न सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's meeting at Baramati cause problem in Dahihandi festival