धनगर समाजाला अारक्षण मिळूच नये यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न : उत्तम जानकर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

मुख्यमंत्र्यांनी अारक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा 'टिस्'च्या माध्यमातून धनगरांना अारक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालविली असल्याचा अारोप उत्तम जानकर अाणि गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. 

पुणे : राज्यातील दिड कोटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षापासून घटनादत्त अारक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगर अादिवासी जमात उभी करुन समाजाला अारक्षणापासून वंचित ठेवले अाहे.  2014 साली राज्यातील धनगर समाजाने अारक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकार आणले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी अारक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा 'टिस्'च्या माध्यमातून धनगरांना अारक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालविली असल्याचा अारोप उत्तम जानकर अाणि गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. 

गेल्या तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, अादिवासी मंत्रालय यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड अाढळून अाला नाही. दरम्यान, धनगर समाजाला अारक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 93 हजार धनगड, तर एकूण 19 लाख 50 हजार बोगस अादिवासी दाखविले अाहेत. यावर अादिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे 9.5 अामदार, तर 30 टक्के अनुदान अाणि 30 टक्के नोकऱ्या या इतर समाजाच्या बोगसगिरी करुन हडपल्या अाहेत, त्यामुळे सर्व अादिवासी मंत्री, अामदार व बोगस लाभधारक व नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.

राज्यातील धऩगर समाजाची एकच मागणी अाहे.  मात्र, अाघाडी सरकराच्या काळात खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात र च ड झालेले नसून धनगर व धनगड या भिन्न जाती अाहेत. त्यांच्या चालीरिती रुढी पंरपरा, देवदेवता वेगळे असल्याची खोटी माहिती दिली. तसेच मंबई उच्च न्यायालयात मधु शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरकारकडून अादिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर व धनगड या भिन्न जाती अाहेत. र च ड झालेले नाही. तसेच 'टिस'च्या माध्यमातून अारक्षण देणार असल्याची खोटी माहिती सादर केली अाहे. त्यामुळे या दोघांवर संसदेची अाणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी, तसेच धनगर समाजाची फसवणूक केल्याप्रकणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली. 

''समस्त धनगर समाजाच्या वतीने सरकारला हा अंतिम इशारा असून सरकारने राज्यात एकतरी धनगड दाखवावा अन्यथा 1 सप्टेंबर 2018 पूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचा दाखला द्यावा.'' ,अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.

धनगर अारक्षणाच्या अखेरच्या लढ्याला 1 अाॅगस्टपासून पुण्यातून सुरवात... 
समस्त धनगर समाजाच्या वतीने धऩगर समाजाच्या अारक्षणाच्या अखेरच्या लढ्य़ाला 1 अाॅगस्टला पुण्यातील कर्वे नगर येथील दुधाने लाॅन्स येथून लाखो बांधवाच्या साथीने सुरवात होणार अाहे. यावेळी धनगर अारक्षणाच्या धगधगत्या स्फुर्ती गीताच्या ध्वनी चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 

Web Title: Chief Minister's trying to prevent Dhangar community from getting reservation said Uttam Jankar