सांगा... घरकूल कधी देणार? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पिंपरी - महापालिकेतर्फे चार महिन्यांपूर्वी चिखली घरकुल प्रकल्पातील 864 सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. लाभधारकांना स्वहिस्सा भरण्यात सांगण्यात आले. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून इमारतींचेच बांधकाम रखडलेले असल्यामुळे पात्र ठरूनही लाभधारकांना घरांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 

पिंपरी - महापालिकेतर्फे चार महिन्यांपूर्वी चिखली घरकुल प्रकल्पातील 864 सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. लाभधारकांना स्वहिस्सा भरण्यात सांगण्यात आले. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून इमारतींचेच बांधकाम रखडलेले असल्यामुळे पात्र ठरूनही लाभधारकांना घरांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 

शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने महापालिकेने चिखलीत स्पाइन रस्त्यालगत घरकुल प्रकल्प राबविला आहे. लाभधारकांना सदनिकेच्या रकमेच्या दहा टक्के रक्कम स्वहिस्सा म्हणून भरावी लागत आहे. त्यासाठी महापालिकेने वेगवेगळ्या बॅंकांच्या माध्यमातून लाभधारकांना कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकूण 162 इमारतींच्या प्रकल्पात सहा हजार 804 सदनिकांचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी सिल्व्हर ओक कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड आणि पवार पाटकर अँड डी. एस. कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएट यांना कंत्राट दिलेले आहे. त्यापैकी सिल्व्हर ओकने त्यांच्याकडील 108 इमारतींचे बांधकाम पूर्ण करून लाभधारकांना सदनिकांचा ताबाही मिळालेला आहे. सदनिकांना धारकांच्या नावे गृहनिर्माण सोसायट्या स्थापन केलेल्या आहेत. 

सद्य:स्थिती 
"पवार पाटकर' यांच्याकडून 54 इमारती उभारण्यात येणार होत्या. त्यापैकी 25 इमारती पूर्ण झालेल्या आहेत. त्यातील सदनिकांचे वाटप झालेले आहे. 27 इमारतींचे काम सुरू आहे. त्यापैकी 11 इमारतींचे अंतिम टप्प्यातील काम शिल्लक आहे. दहा इमारतींचा पाया, तर सहा इमारती प्रथमावस्थेतच आहेत. 

इमारतींची दुरवस्था 
गेल्या आठ महिन्यांपासून काम थांबलेले असल्याने प्रशासनाचे इमारतींकडे दुर्लक्ष झाले आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींच्या खिडक्‍यांच्या काचा फोडल्या आहेत, वायरिंग तोडली आहे, फरशी फोडल्या आहेत, टॉयलेट व बेसिनची भांडीही फोडलेली आहेत. त्यामुळे लाभधारक राहायला येण्यापूर्वीच इमारतींची दुर्दशा झालेली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. 

सबठेकेदार, मजुरांची उपासमार 
घरकुलाच्या कंत्राटदाराने पेंटिंग, इलेक्‍ट्रिक वर्क, प्लॅस्टर, लेबर सप्लाय, कोअर कटिंग, टाइल वर्क, प्लंबिंग, डोअर फिटिंग, लिफ्ट मशिन, सेंट्रिंग वर्क, फायर सेफ्टी आदी कामांसाठी सुमारे 25 उपठेकेदार नियुक्त केलेले आहेत. इमारतींची कामे थांबल्याने या ठेकेदारांची बिलेही थकलेली आहेत. परिणामी, त्यांच्याकडे काम केलेल्या मजुरांना कामाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे इतरत्र काम शोधायचे की येथेच थांबायचे अशा कात्रीत मजूर सापडलेले आहेत. साधारणतः 300 ते 500 रुपयांपर्यंत त्यांची मजुरी असते. 

घरकुल प्रकल्पाची जागा प्राधिकरणाची असल्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला त्यांच्याकडून घ्यावा लागतो. त्यासाठी प्राधिकरणाला पत्र पाठविलेले आहे. सद्य:स्थितीत 864 लाभधारकांची सोडत काढलेली आहे. अपात्र ठरलेल्या व्यक्तींना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केलेले आहे. 
- चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त, महापालिका 

Web Title: Chikhali Gharkul Project