महिनाभरात हजारावर चिकुनगुनियाचे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

पुणे - चिकुनगुनियाच्या डंखाने पुणेकरांना बेजार केले असून, ऑक्‍टोबरमध्ये या रुग्णांची संख्या एक हजारावर गेल्याची नोंद महापालिकेच्या दफ्तरात झाली आहे. गेल्या पाच वर्षांमधील चिकुनगुनियाचा हा सर्वांत मोठा उद्रेक आहे. 

पुणे - चिकुनगुनियाच्या डंखाने पुणेकरांना बेजार केले असून, ऑक्‍टोबरमध्ये या रुग्णांची संख्या एक हजारावर गेल्याची नोंद महापालिकेच्या दफ्तरात झाली आहे. गेल्या पाच वर्षांमधील चिकुनगुनियाचा हा सर्वांत मोठा उद्रेक आहे. 

जुलैपासून सुरू झालेल्या पावसाचे पाणी शहरात ठिकठिकाणी साचून राहिले. त्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली. स्वच्छ पाण्यावर पैदास होणाऱ्या एडिस इजिप्ती या डासामुळे शहरात गेल्या दोन महिन्यांमध्ये डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. 
शहरात मेमध्ये 21 चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या ऑक्‍टोबरमध्ये एक हजार 234 पर्यंत वाढली आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्यात सातत्याने वेगाने वाढ होत आहे. जानेवारीपासून ते आतापर्यंत महापालिका हद्दीमध्ये एक हजार 957 जणांना चिकुनगुनिया झाल्याची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. 

डेंगी काही अंशी नियंत्रणात 
संगमवाडीला सर्वाधिक रुग्ण 

चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण (314) संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. त्या खालोखाल ढोले पाटील (246), भवानी पेठ (230) आणि कोथरूड (214) क्षेत्रीय कार्यालयात या रुग्णांची संख्या मोठी आहे. ऑक्‍टोबरमध्ये संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयात 209 रुग्ण आढळले असून, त्या पाठोपाठ कोथरूड भागात (185) रुग्णांची नोंद झाली आहे. 

डेंगी नियंत्रणात 
सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये 214 रुग्णांना डेंगी झाला होता. हे प्रमाण ऑक्‍टोबरमध्ये 188 पर्यंत कमी झाले आहे. 

सांधेदुखीने रुग्ण बेजार 
चिकुनगुनिया झालेले बहुसंख्य रुग्ण सांधेदुखीने अद्यापही बेजार असल्याचे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. औषधोपचारामुळे चिकुनगुनिया बरा झाला तरीही सांधेदुखी पुढील दोन ते तीन महिने कायम राहते. अशा सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचेही वेगवेगळ्या डॉक्‍टरांनी सांगितले. 

या महिन्यापासून थंडी वाढत असल्याने डासांची पैदास कमी होईल. पर्यायाने डेंगी आणि चिकुनगुनिया हे कीटकजन्य आजार नियंत्रित करता येतील. आपल्या घरात किंवा परिसरामध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घेणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. एस. टी. परदेशी, मुख्य आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: chikungunya patients